Sign In New user? Start here.

नावात काय आहे?

 

सुभग ओंक

Juliet: "What's in a name? That which we call a rose, By any other name would smell as sweet."

शेक्सपियर म्हणाला होता, “नावात काय आहे?”. माझा हा मराठी ब्लॉग सुरु करताना माझ्याही डोक्यात अगदी हाच विचार आला, की “नाव कशाला हवं?”, “नावात काय आहे”? मन मात्र अडून बसलं.... “नाव” हवंच. प्रत्येक गोष्टीला नाव हे असतच! झालं, मनाचं आणि बुद्धीचं भांडण सुरु झालं.... आणि शेवटी एका भाऊक मराठी (अथवा भारतीय) माणसासारखं, मन जिंकलं. मी माझ्या ह्या ब्लॉगला नाव द्यायचं ठरवलं, आणि पुन्हा गुंता सुरु झाला.

नाव असं हवं, जे ह्या ब्लॉगचे वैशिष्ठ, सध्या-सोप्या शब्दात मांडेल. “साध-सोप्प”.... हे नाव म्हणून आवडल... आणि काही दिवस ते मनात रुजलं देखील. पण एकंदर मला ह्या ब्लॉग मध्ये ज्या गोष्टी मांडायच्या आहेत, म्हणजे, माझे अनुभव, मी शिकेलेल्या गोष्टी, मी केलेल्या/पाहिलेल्या चुका, माझ्या संवेदना, कधी-कधी होणाऱ्या त्या some-वेदना, ते आनंदाचे क्षण ... हे सगळं काही “साध-सोप्प” नाही. “माझे अनुभव”... हे नाव फारच रुक्ष वाटलं...नकोसं झालं.

मग खूप नावं मनात आली, “आठवणींची शिदोरी”, “मृद्गंध”, “आजीची गोधडी” ... अशी बरीच नावं माझ्या जाणीवांना शिवून गेली खरी पण कोणाही एका नावाने मनात घर केले नाही. “असं का होतंय?” ह्याचा मी विचार करू लागलो. मी कोण? मला ह्या ब्लॉग मध्ये काय सांगावंसं वाटतं? ह्या प्रश्नांची उत्तरं ब्लॉग च्या नावारूपाला, ब्लॉग च्या ओळखीला, ब्लॉग च्या वाचकांना पोषक ठरतील... असं वाटलं, आणि म्हणून ती उत्तरं शोधायचा हा प्रयत्न... (सुचलेलं नाव: ‘शोधा म्हणजे सापडेल’)

मी सुभग ओक. मुंबईत वाढलेला मध्यमवर्गीय परिस्थितीला, सध्या Microsoft मध्ये काम करणारा एक software-developer. २००० मध्ये अमेरिकेत M.S करायला आलो आणि आता गेली १० वर्ष Seattle,WA मध्ये राहतोय. कामा बरोबर, नाटकं लिहिणं, ती बसवणं, त्यात भूमिका करण हे उद्योग चालूच. कविता व लेख लिहिणं, मराठी कवितांना चाली बसवणं, abstract painting करण, असा माझा व्यासंग. ह्याच माझ्या नाट्य कलेच्या प्रेमामुळे मला मुंबईत आणि इथे अमेरिकेत खूप अनुभव मिळाले, खूप माणसं भेटली, खूप काही शिकलो आणि बऱ्याच गोष्टी जवळून पहिल्या. मी जिथे जातो तिथे मला नेहेमी लोकं सांगतात “अरे तू काहीतरी कुठेतरी लिहीत जा ना, आम्हाला आवडेल वाचायला... ब्लॉग वगरे लिही की” ... मी त्यांना विचारायचा... “कसला ब्लॉग?”.... ते म्हणायचे ... “कसला हि ... तू लिहितोस छान, तू सांगतोस खूप रंगवून.... तेव्हा बघ... लिही काहीतरी...(सुचलेलं नाव: ‘काहीतरी वेगळच’).” पण माझं आयुष्य काही फार झगमगीत नाही किंवा मी काही कोणी मोठा कर्तृत्ववान माणूस नाही, तेव्हा आयुष्यावर लिहिण्यासारखं फारसं नाही आणि तेवढा मी मोठा हि नाही.

तेव्हा ब्लॉग लिहायचे नेमकं प्रयोजन काय (सुचलेलं नाव: ‘कारण की’).... हा प्रश्न मला पडलाच. जे मला लिहायला आवडेल ते लोकांना वाचायला आवडेल का, हा हि प्रश्न होताच. ह्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात मी निघालो (सुचलेलं नाव: “उत्तरांच्या शोधात”)....अजुनही उत्तरं आणि नावाव्च्या शोधात आहे मी .... पण त्याबद्दल पुढच्या ब्लॉग लेखात ....

- सुभग ओक

 
आणखी ब्लॉग