Sign In New user? Start here.
100 days new serial on zee marathi
पुन्हा सुरु होणार रहस्याचा एक नवा थरार हंड्रेड डेज
LIGHT-HOUSE"
 
 

पुन्हा सुरु होणार रहस्याचा एक नवा थरार हंड्रेड डेज

मराठी मालिकांच्या विश्वात झी मराठीने आजवर अनेक यशस्वी प्रयोग केले.आता याच वेळेत हंड्रेड डेज ही एक रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्यातून रहस्याचा एक नवा थरार बघायला मिळणार आहे. येत्या २४ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका शंभर भागांचीच आहे. शंभर दिवसात उलगडणा-या रहस्याचा उत्कंठावर्धक प्रवास या मालिकेतून बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन लोकप्रिय कलाकार म्हणजेच तेजस्विनी पंडित आणि आदिनाथ कोठारे या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. याशिवाय मालिकेत रमेश भाटकर, अर्चना निपाणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कधी कधी एखादी व्यक्ती एखादं रहस्य स्वतःजवळ बाळगून असते.. आणि कधी कधी एखादी व्यक्ती स्वतःच एक रहस्य असते.. अशा व्यक्तीच्या सहवासात राहूनही तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळत नाही आणि ती कधी कुठला डाव खेळेल ते सुद्धा सांगता येत नाही.. अशाच एका रहस्याची, त्या रहस्यामागे असणा-या व्यक्तीची आणि त्या रहस्याचा शोध घेणा-या प्रामाणिक पोलिस अधिका-याची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘हंड्रेड डेज’ या मालिकेतून. हंड्रेड डेजची गोष्ट आहे राणी (तेजस्विनी पंडित) आणि धनंजय सरदेसाई (रमेश भाटकर) या जोडप्याची. दोघांचा संसार सुरळीत आणि सुखात सुरु आहे. एके दिवशी धनंजय अचानक बेपत्ता होतो... अनेक ठिकाणी शोधाशोध घेऊनही धनंजयचा माग लागत नाही. धनंजयच्या बेपत्ता प्रकरणाची जबाबदारी पोलिस इनस्पेक्टर अजय ठाकूर (आदिनाथ कोठारे) याच्याकडे येते. अजय एक प्रामाणिक पोलिस अधिकारी. कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा आणि प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावणारा अधिकारी अशी त्याची प्रतिमा पोलिसदलात आणि गुन्हेगारी विश्वातही आहे. या केसच्या निमित्ताने तो राणीला भेटतो आणि त्याला कळतं की या सर्वामागे राणीच असण्याची शक्यता जास्त आहे परंतु त्याच्याकडे ठोस पुरावा नसल्याने तो तिला अटकही करु शकत नाही. अजयच्या प्रामाणिकपणाबद्दल राणीलाही माहित आहे त्यामुळे स्वतः जाळ्यात अडकण्याऐवजी अजयलाच कसं आपल्या जाळ्यात ओढता येईल याचा प्रयत्न राणी सुरु करते.. या दोघांच्या शह-काटशहाची ही रोमहर्षक गोष्ट आहे.

शंभर दिवसात उलगडणार रहस्य

‘हंड्रेड डेज’ ही मालिका शंभर भागांची असणार आहे. दैनंदिन मालिकांच्या विश्वात एखादी मालिका ठरवुन मर्यादित भागांची करण्याचा हा एक वेगळा प्रयोग या निमित्ताने झी मराठी करणार आहे. शंभर दिवस ही मर्यादा आणि सोबतीला रहस्याची फोडणी यामुळे मालिका रोज एक नवा वेध घेत रहस्याचा उलगडा करत पुढे सरकणार आहे.रहस्यमय मालिकेत आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालेकची टीम पुन्हा एकदा हंड्रेड डेज च्या निमित्ताने एकत्र आली आहे. रात्रीस.. ची निर्मिती करणारे संतोष अयाचित आणि सुनिल भोसले यांच्या साजरी क्रिएटीव्हजनेच या मालिकेची निर्मिती केली असून त्याचं लिखाण संतोष अयाचित यांचे तर संवाद लेखन प्रल्हाद कुडतरकर यांचं आहे तर दिग्दर्शन विघ्नेश कांबळी यांचं असणार आहे. हिंदी संगीतक्षेत्रात आपल्या वेगळ्या गायकीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकणा-या आणि सुफी गाण्याचा आजचा आवाज असलेल्या हर्षदीप कौरने या मालिकेचे शीर्षक गीत गायले आहे. एका बंदिशीवर आधारित या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे पंकज पडघन यांनी.आपल्या नजरेच्या जाळ्यात समोरच्या व्यक्तीला सहजपणे अडकवणा-या एका तरुणीची आणि कोणत्याच मोहात न अडकणा-या एका प्रामाणिक पोलीस अधिका-याची ही उत्कंठावर्धक गोष्ट येत्या २४ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.