Sign In New user? Start here.

‘दिल दोस्ती दुनियादारीचा’‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’

3d rock concert at pune
‘दिल दोस्ती दुनियादारीचा’‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’
3d rock concert at pune"
 
 

‘दिल दोस्ती दुनियादारीचा’‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’

महाविद्यालयीन तरूण तरूणींच्या लांबच लांब रांगा.. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्षात बघण्याची भेटण्याची प्रचंड उत्सुकता.. सभागृहात प्रवेश केल्यानंतर उर्जेने भारलेला एकच जल्लोष आणि कलाकार रंगमंचावर येताच अनावर झालेला आनंद हे सगळं चित्र बघायला मिळालं पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या आवारात थ्री डी रॉक कॉन्सर्ट या शानदार कार्यक्रमात. निमित्त होतं झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली मालिका. या मालिकेच्या लोकप्रियता सध्या तरूणवर्गात प्रचंड प्रमाणात आहे. तरूणाईच्या भाषेत सांगायचं झालं तर याबद्दल एख तुफान क्रेझ प्रत्येकाच्या मनात आहे. ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असं म्हणत मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मंडळी म्हणजे झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील दोस्तांची गॅंग. रोज रात्री १०.३० वा. टिव्हीवरून भेटायला येणारे सुजय, कैवल्य, आशुतोष, अॅना, मीनल आणि रेश्मा हे माजघरातील मित्र आज आपल्याला प्रत्यक्षात भेटणार यासाठी तरूणाईने या रॉक कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. झी मराठीवरील सारेगमपच्या मागच्या पर्वाची विजेती जुईली जोगळेकरच्या ‘अगम्य बॅंड’च्या सोबतीने दिल दोस्ती..मधील कलाकारांनी एकाहून एक गाणी सादर केली आणि तरूणाईला आपल्या तालावर मोठ्या उत्साहात थिरकायला लावलं.

वेगवेगळ्या कारणाने मुंबई शहरात आलेले आणि इथल्या जगण्याला आपल्या पद्धतीने समजून घेत स्ट्रगलचाही आनंद घेत एकाच फ्लॅटमध्ये राहणा-या या सहा दोस्तांची कथा सध्या सर्वच स्तरांत तुफान लोकप्रिय झाली आहे. आजच्या पिढीचे प्रश्न, त्यांच्या गरजा, त्यांची मानसिक स्थिती, त्यांची स्पेस, त्यांची आव्हाने हे सगळं या मालिकेतून अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात येतं. या वेगळेपणामुळेच अल्पावधीतच ही सारी पात्रं केवळ लोकप्रियच झाली नाही तर ती जणू प्रेक्षकांच्या परिवाराचा आणि दोस्तांच्या कटट्याचाही भाग बनली आहेत. कॉलेजच्या कट्यापासून ते फेसबुकच्या वॉलवर आणि व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर दिल दोस्ती चे हे सहा पात्र म्हणजे सर्वांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय बनले आहेत. यातील प्रत्येक पात्रामध्ये प्रेक्षक स्वतःचा आणि आपल्या मित्रांचा शोध घेतात अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही विविध माध्यमांतून वाहिनीला आणि कलाकारांना मिळतच असतात. प्रेक्षकांच्या मनात या पात्रांविषयी असलेली उत्सुकता, त्यांना भेटण्याची असलेली ओढ लक्षात घेऊनच त्यांच्यापर्यंत थेट पोहचण्यासाठी या खास रॉक कॉन्सर्टचं आयोजन झी मराठीच्या वतीने करण्यात आलं होतं.

गुरूवारी सायंकाळी येथील गणेश कला क्रीडा रंगमंचावर पार पडलेल्या या रॉक कॉन्सर्टचं धम्माल निवेदन केलं सर्वांच्या लाडक्या आशूने. मालिकेमध्ये कैवल्यचं पात्र हे एका रॉकस्टारचं आहे त्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. मग कैवल्यनेही यारो दोस्ती बडीही हसीन है हे गाणं गाऊन सर्वांची मने जिंकली. प्रेक्षकांसाठी ख-या अर्थाने सरप्राईज परफॉर्मन्स ठरला तो मीनल आणि सुजयचा. मीनल ने ‘अब के सावन ऐसे बरसे’ हे गाणं गाऊन आपल्या गायनाने सर्वांना चिंब भिजवलं तर ‘डुबा डुबा रहता हूं’ हे हळुवार गीत सादर करून सुजयने सर्वांना प्रेमाच्या एका अनोख्या विश्वात नेलं. याशिवाय अॅना आणि रेश्माने निवेदनात आशूला सोबत तर दिलीच शिवाय काही गाणी सादर करून रसिकांसोबत ठेकाही धरला. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो सादर झालेलं शेवटचं गाणं. ‘पट्टाखा गुड्डीहो’ आणि ‘पुरा लंडन ठुमकदा’ या गाण्यावर सर्वच कलाकारांनी रंगमंचाच्या खाली उतरून आणि प्रेक्षकांमध्ये मिसळून ठेका धरला आणि संपूर्ण सभागृहाला नाचायला भाग पाडले.

--------------------