Sign In New user? Start here.

आदेश बांदेकर उलगडणार नव्याने सासू सुनेचं नातं

"aadesh

आदेश बांदेकर उलगडणार नव्याने सासू सुनेचं नातं

"aadesh bandekar new serail on zee marathi"

 
 

आदेश बांदेकर उलगडणार नव्याने सासू सुनेचं नातं

आदेश बांदेकर उलगडणार नव्याने सासू सुनेच नातं तुम्हाला वाटत असेल की यात नवीन असं काय आहे. आदेश बांदेकर आपल्या स्वत:च्या कार्यक्रमात म्हणजे होम मिनीस्टर मधे हेच काम करतात. तुम्ही बरोबर आहात पण आता मालिकेच्या माध्यमातून ते हे नात उलगडणार आहेत. मराठीवर ‘नांदा सौख्य भरे’ या झी मराठीवरील आगामी मालिकेतून. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेली ही मालिका येत्या २० जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत असून यात सुहास परांजपे (ललिता), ऋतुजा बागवे (स्वानंदी) आणि चिन्मय उदगिरकर (नील) मुख्य भूमिकेत दिसतील.

‘नांदा सौख्य भरे’ ही कथा आहे देशपांडे आणि जहागिरदार कुटुंबियांची. कधी काळी आपल्या पूर्वजांकडे असलेलं ऐश्वर्य आणि जमिन जुमला पुढच्या पिढीच्या नाकर्तेपणामुळे गमावून बसलेलं जहागिरदार कुटुंब. पण अजूनही डोक्यात आणि स्वभावात तीच मिजास कायम असलेलं. विशेषतः ललिता अजूनही त्याच खोट्या रुबाबात वावरत स्वतःचं खोटं वैभव मिरवतेय. हा खोटेपणा जणू तिच्या जगण्याचाच भाग बनलाय. तिचा मुलगा नील परदेशात शिकून भारतात आलाय. त्याच्या वधू संशोधनाची जबाबदारी ललिताने वच्छी आत्याकडे दिलीये. दुसरीकडे देशपांडे कुटुंब अतिशय इमानदार आणि साधं सरळ. आयकर विभागात मोठ्या पदावर असलेले देशपांडे अतिशय प्रामाणिक अधिकारी. एकत्र कुटुंबात आपल्या प्राध्यापक भावासोबत राहतात. देशपांडेंना संपदा आणि स्वानंदी अशा दोन मुली. संपदाची स्वप्नं या कुटुंबापेक्षा खूप वेगळी. तिला हे मध्यमवर्गीय जगणं आवडत नाही तर स्वानंदी अगदी आपल्या वडिलांसारखी. तत्वनिष्ठ आणि कायम खरं बोलणारी. जिला स्वतःला खोटं बोलायला आवडत नाही आणि इतरांचा खोटेपणाही जी खपवून घेत नाही. या स्वानंदीसाठी विवाहाचा प्रस्ताव येतो तो जहागिरदार कुटुंबातून आणि यासाठी कारणीभूत ठरते वच्छी आत्या. ललिताकडे नीलच्या लग्नासाठी अनेक प्रस्ताव घेऊन गेलेल्या वच्छी आत्याचा ललिताबाई प्रचंड अपमान करतात. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि ललिताबाईच्या खोट्या वैभवाची मिजास उतरविण्यासाठी वच्छी आत्या नियोजित पद्धतीने स्वानंदीचं स्थळ ललिताबाईकडे नेते. ललिताही स्वानंदीसाठी पसंती देते आणि इथूनच सुरुवात होते ते खोटेपणाच्या चालीवर खरेपणाने केलेल्या विजयी खेळीची.

अतिशय रंगतदार विषय आणि तेवढ्याच रंगतदार पात्राने ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेची गोष्ट सजलेली आहे. मालिकेत ललिताच्या भूमिकेत सुहास परांजपे, वच्छी आत्याच्या भूमिकेत वर्षा दांदळे, नीलच्या भूमिकेत चिन्मय उदगिरकर तर स्वानंदीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे ही नवोदित अभिनेत्री आहे. मालिकेची कथा संपदा जोगळेकर यांची असून पटकथा अर्चना जोशी यांची आणि संवाद मिथिला सुभाष यांचे आहेत. मालिकेचं दिग्दर्शन वैभव चिंचाळकरने केलंय. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंट या निर्मितीसंस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. आजवर मानवी नातेसंबंधावर आणि कौटुंबिक जिव्हाळ्यावर सकारात्मक भाष्य करणा-या झी मराठीच्या मालिकांच्या ताफ्यात ‘नांदा सौख्य भरे’ दाखल होत आहे. येत्या २० जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रसारित होणार आहे.

 

 

--------------------