Sign In New user? Start here.

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार सुपरस्टार अक्षयकुमार

akshya kumar entry in tujhat jiv rangala
‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार सुपरस्टार अक्षयकुमार
LIGHT-HOUSE"
 
 

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार सुपरस्टार अक्षयकुमार

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरच्या लाल मातीतला रांगडा गडी राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरात आली आहे. स्वभावाने अतिशय भोळा आणि साधा असलेला राणा अंजलीला आवडू लागलाय. राणाच्याही मनात अंजलीबद्दल प्रेमाची भावना रुजु लागलीये पण हे प्रेम त्याला नेमकं उमजत नाहीये. आता याच प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी त्याच्या मदतीला येतोय जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली म्हणजेच बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षयकुमार. आपल्या आगामी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरीता अक्षय कुमार या मालिकेत बघायला मिळणार आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे हे विशेष भाग १ आणि २ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वा. झी मराठीवरुन प्रेक्षकांना बघायला मिळतील. अंजलीचा मित्र कल्पेश तिला आणि राणाला घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलाय जिथे राणाची गाठ जॉलीशी पडते. याठिकाणी कल्पेश कपड्यांवरुन आणि भाषेवरुन राणाची टर उडवतो. यामुळे राणाचा आत्मविश्वास कमी होतो. याचवेळी एका ज्येष्ठ वकिलाची भेट घेण्यासाठी आलेला जॉली हा सगळा प्रकार बघतो आणि तो राणाला गाठून त्याला आपला ‘वकीली’ सल्ला देतो. राणाच्या मनात असलेल्या अंजलीबद्दलच्या भावना कशा ख-या आहेत आणि हे प्रेम कसं यशस्वी होईल याबद्दलचा विश्वास तो राणाला देतो. यामुळे राणाचाही आत्मविश्वास बळावतो आणि अंजलीला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी तो तयार होतो.

‘तुझ्यात जीव रंगला’च्या या विशेष भागाचं चित्रीकरण नुकतंच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलं. आजवर या मालिकेचं चित्रण कोल्हापूरच्या जवळच्या भागात, शेतात पार पडत होतं यानिमित्ताने पहिल्यांदाच बाहेरच्या ठिकाणी चित्रीकरण होणार असल्यामुळे कलाकारही उत्साही होते. सुपरस्टार अक्षयकुमारच्या उपस्थितीने सेटवरचं सारं वातावरणचं भारावून गेलं होतं. अक्षयच्या येण्याने कलाकार उत्सुक होतेच पण थोडसं दडपणही होतं परंतु त्याने आपल्या खेळकर स्वभावाने हे दडपण दूर केलं. त्याने सेटवर सर्व कलाकारांशी, लेखक-दिग्दर्शकाशी छान गप्पा मारल्या. ही दृश्ये कशा प्रकारे चित्रीत होतील ते समजून घेतलं. मालिकेच्या दोन भागांमध्ये अक्षय दिसणार असून मराठी संवाद म्हणणार आहे हे विशेष. यापूर्वी अक्षयकुमार झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सहभागी झाला होता परंतु अशा प्रकारे एखाद्या मराठी दैनंदीन मालिकामध्ये येऊन चित्रपटाची प्रसिद्धी करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. अक्षयकुमारचा सहभाग असलेले ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे हे विशेष भाग १ आणि २ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वा. झी मराठीवरुन प्रेक्षकांना बघायला मिळतील.

हे सारं स्वप्नाप्रमाणेच - हार्दिक जोशी (राणा)

आमच्या सेटवर सुपरस्टार अक्षयकुमार येतायत हे आम्हाला शेवटपर्यंत माहित नव्हतं. फक्त कुणी तरी स्पेशल कॅरेक्टर असणार एवढंच सांगण्यात आलं होतं. शूट सुरु झालं आणि अचानक अक्षय सरांची एन्ट्री झाली. मला एक क्षण विश्वासच बसला नाही. आमच्यासाठी हे सारं स्वप्नाप्रमाणेच होतं. आजवर ज्या कलाकाराला फक्त चित्रपटात बघत होतो ते माझ्यासमोर होते. त्यांच्या सोबत हे सीन करताना खूप छान वाटलं. आधी थोडसं दडपण होतं पण अक्षय सरांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं. झी मराठीच्या आणि या मालिकेच्या माध्यमातून आजवर लोकांपर्यंत पोचता येतय त्याचा आनंद होताच परंतू आज या कामाचा अभिमान वाटत आहे.

 
 

63