Sign In New user? Start here.

‘दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ‘तुफान आलंया’
LIGHT-HOUSE"
 
 

‘दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ‘तुफान आलंया’

वाढता उन्हाळा आणि रिकामे होणारे पाण्याचे साठे हे चित्र महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. कालपर्यंत मराठवाडा, विदर्भाला सतावणारा पाण्याचा प्रश्न आता हा हा म्हणता पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा येऊन पोचलाय. या परिस्थितीसाठी पावसाची अनियमितता आणि बदलणारी नैसर्गिक स्थिती अशी कारणे आपण देत असलो तरी यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत याचं भान फार कमी जणांना आहे. पाण्याचं हे दुर्भिक्ष्य चहु बाजुंनी सुरु असताना त्यावर काय उपाय करायचे याबद्दल चर्चेपलिकडे फार काही घडताना दिसत नाही. गावाकडच्या आटणा-या विहिरी, जादा पाणी उपशामुळे वाढत जाणारी पाणी टंचाई, टॅंकरवर अवलंबून राहणारी गावे आणि त्यातही होणारं राजकारण हे चित्र दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललंय. यावर उपाय करण्यासाठी कुणी एकाने प्रयत्न करुन चालणार नाही तर त्यासाठी लोकसहभाग असणं गरजेचं आहे आणि हीच बाब ओळखून काही संस्था त्यासाठी पुढे आल्या आहेत ज्यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते पानी फाउंडेशन या संस्थेचं. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि मायानगरीत वावरुनही सामाजिक भान जपणारे आमिर खान त्यांची पत्नी किरण राव, सहकारी सत्यजित भटकळ आणि पाणी तज्ञ डॉ. अविनाश पोळ यांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आणि गेल्या वर्षी वॉटर कप हा एक अनोखा उपक्रम राबवला.

पाणीटंचाईची सगळ्यात जास्त समस्या असलेल्या महाराष्ट्रातील काही गावांची निवड करुन या समस्येचे निवारण करण्यासाठीचे उपाय, सोपे मार्ग आणि सहज राबवता येईल असे तंत्र त्यांनी गावक-यांना सांगितले. याचा वापर करुन जे गाव दुष्काळमुक्त होईल अशा गावांना खास बक्षिसही ठेवलं. अर्थात यात महाराष्ट्र शासनाची मदतही त्यांना मिळाली. गेल्या वर्षी तीन तालुके आणि ११६ गावांमध्ये रंगलेली वॉटर कप स्पर्धा यंदा तीस तालुक्यांतील १३०० गावांमध्ये रंगणार आहे. यात मराठवाडा, विदर्भ आणि प. महाराष्ट्रातील तालुक्यांचा समावेश असणार आहे आणि या विभागांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी काही खास मंडळींनाही पाचारण करण्यात आले आहे. ज्यात प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर मराठवाड्याचं प्रतिनिधीत्व करतील.

सई ताम्हणकर आणि सुनील बर्वे पश्चिम महाराष्ट्राचं, अनिता दाते आणि भारत गणेशपुरे विदर्भाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत तर जितेंद्र जोशी सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडणार आहे. आठ आठवडे चालणा-या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणा-या संघाला ५० लाख, द्वितीय क्रमांकासाठी ३० लाख आणि तृतीय क्रमांकासाठी २० लाख अशी भरघोस रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम गावाला १० लाख रुपयांचं विशेष बक्षिस मिळणार आहे. या स्पर्धेबद्दलची माहिती सांगणारा आणि स्पर्धेत सहभागी गावांची दुष्काळावर मात करण्याची मेहनत दाखवणारा ‘तुफान आलंया’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय झी मराठीवरुन. येत्या ८ एप्रिलपासून दर शनिवारी रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल याशिवाय दर रविवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत त्याचं पुनःप्रसारण होणार आहे.