Sign In New user? Start here.

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ झी मराठीच्या नव्या मालिका.

Zee marathi new serial nakati and chukbhul
‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ झी मराठीच्या नव्या मालिका
LIGHT-HOUSE"
 
 
 

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ झी मराठीच्या नव्या मालिका.

दर्जेदार मनोरंजनाचं नवं पर्व सुरू करताना नव्या वर्षाच्या प्रारंभाला ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या दोन नव्या मालिकांची खास पर्वणी झी मराठी आपल्या रसिकांसाठी घेऊन येतेय. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या लोकप्रिय नाटकावर आधारित याच नावाची मालिका आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत तर त्यांच्या जोडीला आहेत लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. येत्या १८ जानेवारीपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ तर १० वा. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही कथा राजाभाऊ आणि मालती या वयोवृद्ध दाम्पत्याची आहे. वय झालं असलं तरी या जोडीतील प्रेम आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. जसं प्रेम आहे तसंच या नात्यात एक खट्याळपणासुद्धा आहे. या वयातही राजाभाऊ मनाने अगदी तरुण आहेत आणि या मुद्यावरुन दोघांमध्ये प्रेमळ खटकेही उडतच असतात. राजाभाऊंचा हट्ट की मालतीने त्यांना तरुण म्हणावं आणि मालतीची इच्छा अशी की राजाभाऊंनी हा अट्टाहास सोडावा. या दोघांच्या याच खुसखुशीत नात्याची गंमत या मालिकेतून बघायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक आणि सुशांत तुंगारे या मालिकेची निर्मिती करणार असून त्याचे दिग्दर्शन स्वप्ननील जयकर करणार आहे तर पटकथा आणि संवाद मधुगंधा कुलकर्णीचे असतील. यानिमित्ताने दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने जोडी म्हणून प्रथमच एकत्र येणार आहेत त्यामुळे मनोरंजनासोबतच दर्जेदार अभिनयाची जुगलबंदीही या मालिकेतून बघायला मिळेल. वयवर्षे १०३ असणारी राजाभाऊंच्या आईची भूमिका नयना आपटे साकारत असून तरुणपणीच्या राजाभाऊच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि मालतीच्या भूमिकेत स्नेहा फाटक ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे.

नकटीच्या लग्नाला यायचं हं.. ही कथा आहे देशपांडे कुटुंबियांची. दामोदर निवास या एका जुन्या वाड्यात एकत्र राहणारं हे कुटुंब. दामोदर देशपांडे यांच्या पश्चात या कुटुंबात चंद्रकांत आणि सुर्यकांत ही दोन मुले, मुलगी शैला आणि तिचा नवरा जयंता ही मंडळी एकत्र राहतात. यातील सुर्यकांत आणि विजूची मुलगी आहे नूपुर जिला सर्वजण लाडाने ‘नकटू’ अशी हाक मारतात. याच नकटूची आणि तिच्या लग्नाची ही गोष्ट. या नूपुरचं लग्न या वाड्यातच व्हावं ही दामोदररावांची शेवटची इच्छा होती. या लग्नानंतरच हा जीर्ण झालेला वाडा पाडावा आणि त्याजागी इमारत उभी करावी अशी त्यांची एक प्रकारची अटच. त्यामुळे आता सर्वांना घाई आहे ती नूपुरच्या लग्नाची. यासाठी त्यांच्या नजरेत एक मुलगा सुद्धा आहे तोही याच घरातला तो म्हणजे नूपुरची आत्या शैलाचा मुलगा नीरज. परदेशात असलेला नीरज घरातील एका समारंभानिमित्ताने भारतात येतोय आणि याचवेळी लग्नाची बोलणी करण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्य घेतात. नीरज परत येतो आणि त्याला ही लग्नाची लगबग लक्षात येते आणि तो या लग्नासाठी नकार देतो. खरं तर आजवर नीरजचीच स्वप्ने बघणारी नूपुर त्याच्या या निर्णयाने दुःखी होते त्यामुळे तिच्यासाठी मुलगा शोधण्याची जबाबदारी नीरज स्वतःवर घेतो आणि घरात सुरु होतो कांद्यापोह्याच्या तयारीचा आगळा वेगळा समारोह. नूपुरसाठीचं वरसंशोधन हाच या मालिकेचा मुख्य गाभा!! आता नकटीसाठी कोणकोणती स्थळे येतात तोच या मालिकेचा महत्त्वाचा आणि गंमतीचा भाग असणार आहे.

नकटीला बघायला येणार सेलिब्रिटी हलक्याफुलक्या ढंगाने रंगणा-या या गोष्टीत धम्माल आणणार आहेत ते नकटीला बघायला येणारी वर मंडळी. दर आठवड्याला या मालिकेत सेलिब्रिटी वरमंडळीची हजेरी लागणार आहे ज्यामध्ये अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, शशांक केतकर, अवधूत गुप्ते आणि इतर बरेच लोकप्रिय कलाकार बघायला मिळणार आहेत. या सर्वांच्या व्यक्तिरेखाही तेवढ्याच धम्माल पद्धतीने लिहिण्यात आल्या आहेत. याचं आदरातिथ्य करतांना देशपांडे कुटुंबांची उडणारी तारांबळ, प्रत्येक मुलगा कसा योग्य आहे नूपुरला पटवून देताना त्यांच्या नाकी नऊ येणार आणि काही ना काही कारण देत नूपुर त्या मुलाला नकारही देणार.या मालिकेत नूपुरच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी. याशिवाय मालिकेत संजय सुगावकर, पौर्णिमा तळवलकर, आसित रेडीज, वर्षा दांदळे, शकुंतला नरे, रागिनी सामंत, सोनाली पंडित, आनंदा कारेकर, अभिनय सावंत, अभिजीत आरकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे गौतम कोळी यांनी. किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांची पटकथा तर प्रल्हाद कुडतरकर यांचे संवाद आहेत. येत्या १८ जानेवारीपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ तर १० वा. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ असा मनोरंजनाचा डबल धमाका झी मराठीच्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.