Sign In New user? Start here.

डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो झी मराठीवर

Dr.prakash  baba amte movie on zee marathi
डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो झी मराठीवर
Dr.prakash  baba amte movie on zee marathi "
 
 

डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो झी मराठीवर

गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा हा अतिदुर्गम जंगलातील भाग. जिथे शहरातील माणूसच काय पण सूर्यकिरणंही पोहचणं अवघड होतं. जगाची गोष्ट तर दूरच पण महाराष्ट्राच्या नकाशावरही अशा गावाचे पुरावे मिळणं कधी काळी अशक्य होतं. अशा ठिकाणी जाऊन शहराचे सुखवस्तू जीवन नाकारून आयुष्याची एक नवी सुरुवात करणं ही कल्पनाही अशक्यच. पण ही कल्पनाच नव्हे तर ते स्वप्न उराशी बाळगून एक अवलिया आपल्या पत्नी आणि सहका-यांसह तिथे जातो.... आपल्या निस्सीम, निःस्वार्थ सेवेने आदिवासींच्या जीवनात नंदनवन फुलवतो आणि हेमलकसाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवतो. हा अवलिया म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. प्रकाश बाबा आमटे. समर्पण या शब्दाला जागणारे नव्हे तर जगणा-या डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटेंची ही कथा “डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रिअल हिरो” या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आली आणि तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक मानाच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवलीच शिवाय प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळवले. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय झी मराठीवरून. येत्या रविवारी, २६ जुलैला सायंकाळी ७.०० वा. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

भारतामध्ये समाजसेवकांची एक मोठी परंपरा आहे. स्वतःच्या सुखवस्तू आय़ुष्याचा त्याग करत दिवसरात्र समाजासाठी काम करणारे अनेक थोर समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले. ती परंपरा तो वारसा आजही अनेकजण निस्वार्थीपणे चालवत आहेत. यात एक महत्त्वाचं नाव आहे ते आमटे कुटुंबियांचं. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्या आयुष्यात आनंदवन फुलवलं तर त्यांचा मुलगा डॉ. प्रकाश आणि सून डॉ. मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसा येथे अंधश्रद्धा, रोगराई आणि अज्ञानाच्या विळख्यात अडकलेल्या आदिवासींच्या आयुष्यात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षणाचं नंदनवन फुलविलं. या व्रतस्थ दाम्पत्याची, त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या जिद्दीची कथा यापूर्वी अनेक पुस्तके, लेख, आणि लघुपटांच्या माध्यमातून जगासमोर आली होती.

रेमन मॅगससे सारख्या अतिशय मानाच्या पुरस्काराने गौरविल्या गेलेल्या या दाम्पत्यांच्या कार्याची दखल जगभरातून अनेकांनी घेतली. त्यांच्या याच यशाची गाथा “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” आमटे दाम्पत्याच्या कथेने प्रेक्षकांना हेलावून सोडले. शहराच्या चकचकीत वातावरणात जगणा-या आणि सर्व सोयी सुविधा मिळत असूनही सतत तक्रार करणा-या अनेकांना या कथेने अंतर्मुखही केले. प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, माणुसकी आणि प्रेम यांच्या जोरावर केवळ आदिवासीच नाही तर हिंस्त्र प्राण्यांनाही कसं आपलंसं करता येतं हे डॉ. आमटेंच्या जीवनप्रवासातून उमगलं. हाच अनुभव प्रेक्षकांना पुन्हा एकदा देण्यासाठी “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा चित्रपट त्यांच्या भेटीस येतोय येत्या रविवारी २६ जुलैला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर मधून.

 

 

--------------------