Sign In New user? Start here.

बानू आणि खंडेरायाच्या विवाहाच्या तयारीसाठी अवघी चंदनपुरी सजली

Jai Malhar Khandoba Banu Vivah

देवादिकांसोबतच निसर्गाच्या साक्षीने रंगणारा हा नेत्रदीपक विवाहसोहळा येत्या रविवारी ३ मे रोजी झी मराठीवर सायंकाळी ७.३० वा. ‘जय मल्हार’च्या दोन तासांच्या विशेष भागातून प्रेक्षकांना बघता येणार आहे. याशिवाय याच दिवशी खंडेराया आणि बानूच्या जीवनातील महत्त्वाचे घटनाक्रम सकाळी १० ते सायंकाळी ७.३० पर्यंत रसिकांना पहायला मिळतील.

"Jai Malhar Khandoba Banu Vivah"

 
 

बानू आणि खंडेरायाच्या विवाहाच्या तयारीसाठी अवघी चंदनपुरी सजली

खंडोबा बानूच्या लग्नाच्या रंजक कथा आता भव्य दिव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत जय मल्हार या मालिकेतून. मल्हारी मार्तंड खंडेरायांचा महिमा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या यशोशिखरावर आहे. मणीचुल पर्वतावरील मणी - मल्ल या दैत्यांपासून जेजुरीचं रक्षण करण्यासाठी अवतरलेल्या खंडेरायांची गाथा अतिशय भव्य स्वरूपात प्रेक्षकांनी आजवर या मालिकेतून अनुभवली आहे. मणी मल्लाचा वध, खंडेरायांचा राज्याभिषेक, म्हाळसादेवीसोबतचा विवाह, सारीपाटाचा डाव, खंडेरायांचा जेजुरीचा त्याग, खंडू गावडा बनून बाणाईच्या घरी कामासाठी राहणे या सर्व गोष्टी या मालिकेतून अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. खंडेरायांच्या गाथेतील या पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी बानूला दिलेल्या लग्नाच्या वचनपूर्तीचा सोहळा. बानूला दिलेल्या वचनाप्रमाणे आता खंडेराया तिच्याशी विवाह करणार आहेत. या विवाहासाठी अवघी सृष्टी सजणार आहे. देवादिकांसोबतच निसर्गाच्या साक्षीने रंगणारा हा नेत्रदीपक विवाहसोहळा येत्या रविवारी ३ मे रोजी झी मराठीवर सायंकाळी ७.३० वा. ‘जय मल्हार’च्या दोन तासांच्या विशेष भागातून प्रेक्षकांना बघता येणार आहे. याशिवाय याच दिवशी खंडेराया आणि बानूच्या जीवनातील महत्त्वाचे घटनाक्रम सकाळी १० ते सायंकाळी ७.३० पर्यंत रसिकांना पहायला मिळतील.

हादरलेली म्हाळसा खंडेरायांच्या वाटेत विघ्नं तर आणते परंतू ती सर्व विघ्नं पार करून खंडेराया चंदनपुरी जवळ पोहोचतात तेंव्हा म्हाळसा त्यांना शाप देऊन त्यांचं रुपांतर वृद्धावस्थेत करते. या रुपात चंदनपुरीत पोचलेल्या खंडेरायांना बानू ओळखू शकत नाही. मग खंडोबाही बानूची परीक्षा घेण्याचं ठरवतात आणि खंडू गावडा हे नाव धारण करून तिच्याच घरी नोकर म्हणून राहतात. धनगरपाड्यावर राहणा-या बानूकडे मेंढ्यांचा मोठा कळप आहे. हा कळप सांभाळण्याचं काम खंडू गावडाकडेच आहे. बानूची परीक्षा घेण्यासाठी खंडू गावडा एक खेळी रचतो. तो बानूच्या सर्व मेंढ्या मारून टाकतो. आपल्या प्राणाहून प्रिय मेंढ्या मेल्याचं बघून बानू भयंकर संतापते आणि आपल्या सर्व मेंढ्या जिवंत करून देण्याचा आदेश देते. यावेळी खंडू गावडा मी तुझ्या सर्व मेंढ्या जिवंत करू शकतो पण त्यासाठी तुला माझ्याशी लग्न करावे लागेल अशी विचित्र अट घालतो. या अटीमुळे बानूही चक्रावून जाते पण आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या मेंढ्या जिवंत होतील या आशेपोटी ती ही अट मान्य करते. खंडू गावडा हाती हळदीचा भंडारा घेऊन मेंढ्यांवर टाकतो आणि त्या सर्व मेंढ्या जिवंत करतो. या चमत्काराने बानूसह चंदनपुरीतील समस्त प्रजा अवाक् होते आणि याच प्रसंगी खंडेराया आपल्या मूळ रूपात सर्व भक्तांना दर्शन देतात. आपल्या देवाच्या दर्शनाने बानूचा आनंद गगनाला भिडतो.

आता बानू आणि खंडेरायाच्या विवाहाच्या तयारीसाठी अवघी चंदनपुरी सजली आहे. हा विवाहसोहळा नळ राजाच्या राज्यात म्हणजेच नळदुर्गला पार पडणार आहे ज्यासाठी अवघी सृष्टी सज्ज झाली आहे. या विवाहासाठी आकाशाचा भव्य मंडप असणार आहे तर धरणी माता नव्या रुपात सजणार आहे, वृक्ष - वेली नटुन उभ्या राहणार आहेत. एकीकडे सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे म्हाळसेला मात्र हा विवाह मान्य नाहीये. हा विवाह थांबवण्यासाठी तिने इंद्रदेवाला सोबत घेतलं आहे आणि ती खंडेरायांना रोखण्यासाठी निघाली आहे. या सर्व उत्कंठावर्धक घटना प्रेक्षकांना या विशेष भागात बघायला मिळणार आहेत. या भागासाठी अतिशय उच्च दर्जाची ग्राफिक्स तंत्रमूल्ये वापरण्यात आली आहेत जी टेलिव्हिजनच्या पडद्यावर प्रथमच प्रेक्षकांना बघता येणार आहेत. याशिवाय या लग्न सोहळ्यासाठी एक खास गाणंही चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याचे शब्द आणि संगीत ए.व्ही. प्रफुलचंद्र यांचे असून प्रवीण कुंवर यांनी ते गायलं आहे.

 

 

--------------------