Sign In New user? Start here.
Zee Marathi Awards 2015 ka re durava best serial
नऊ पुरस्कार पटकावत ‘का रे दुरावा’ ने मारली बाजी
Zee Marathi Awards 2015 ka re durava best serial
 
 

नऊ पुरस्कार पटकावत ‘का रे दुरावा’ ने मारली बाजी

आपल्या अनेकविध दर्जेदार कार्यक्रमांनी मराठी रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणजे झी मराठी. या वाहिनीवर आणि इथे सादर होणा-या कार्यक्रमांवर त्यातील कलाकारांवर रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. आपल्या आवडत्या मालिकांबद्दल, कलाकारांबद्दल प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया कळवतच असतात पण त्यांच्या पसंतीची पावती ख-या अर्थाने मिळते ती झी मराठी अवॉर्डच्या माध्यमातून. ‘उत्सव नात्यांचा अतूट मैत्रीचा’ या संकल्पनेने यावर्षीच्या झी मराठी अवॉर्डच्या नामांकनाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती आणि याच उत्सुकतेने आणि उत्साहाने याही वर्षीचा हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यंदा तब्बल नऊ पुरस्कार पटकावत बाजी मारली ती ‘का रे दुरावा’ या मालिकेने . तर ‘जय मल्हार’मधील खंडोबाने सर्वोत्कृष्ट नायकाचा आणि म्हाळसा व बानूने सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. सर्वोत्कृष्ट कुटुंबाचा मान ‘दिल दोस्ती दुनियादारी’ च्या माजघरातील सदस्यांना मिळाला तर या वर्षातील सर्वोत्कृष्ट मालिका ठरली का रे दुरावा. अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडलेला झी मराठी अवॉर्डचा हा भव्य सोहळा येत्या १ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रेक्षकांना बघता येणार आहे.

झी मराठीवरील मालिका असो की यातील व्यक्तिरेखा या सर्वांवरच रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अनेकांसाठी तर ह्या व्यक्तिरेखा म्हणजे आपल्या घरातील सभासदच असतात. कार्यक्रमातील कुटुंबांचा प्रेक्षकही नकळत भाग बनतात त्यामुळेच त्यात घडणा-या घटनांची चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळते. त्यामुळेच श्री जान्हवीसोबत गोखले कुटुंबियांवर रसिक जेवढे प्रेम करतात तेवढाच शशीकलाचा तिरस्कार करतात. जय अदितीच्या दुराव्यातील प्रेमाचं लोकांना अप्रुप वाटतं तर त्यांच्यामध्ये येणा-या रजनीला असं न करण्याचा सल्लाही घरबसल्या देतात. खंडेराया, म्हाळसा, बानू यांची मनोभावे आराधना करतात तर ‘चला हवा येऊ द्या’ च्या थुकरटवाडीत जाऊन मनमुरादपणे हसतात. प्रेक्षकांच्या या प्रेमाने त्या व्यक्तिरेखांना आणि कलाकारांनाही नवीन उर्जा मिळते. याच प्रेमाचा आणि उर्जेचा अनोखा संगम बघायला मिळाला तो झी मराठी अवॉर्डमध्ये. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धा अतिशय चुरशीची होती आणि प्रेक्षकांसाठीही ती एकप्रकारे कसोटीच होती. नायकामध्ये श्री, जय, नील आणि खंडोबा समोरोसमोर उभे ठाकले होते तर आपल्या लोभस अभिनयाने सर्वांना भुरळ घालणा-या जान्हवी, अदिती, स्वानंदी, म्हाळसा आणि बानू सर्वोत्कृष्ट नायिकेच्या स्पर्धेत होत्या. पण यात बाजी मारली ती खंडोबा आणि म्हाळसा व बानूने.

एकत्र कुटुंबव्यवस्था आणि त्यातील मूल्यांची जपवणूक करणे या गोष्टी कायम झी मराठीच्या सर्वच मालिकांमधून बघायला मिळतात. यामुळेच यातील प्रत्येक कुटुंबावर रसिक मनापासून प्रेम करतात. यावर्षी जहागिरदार आणि देशपांडे कुटुंब (नांदा सौख्य भरे), खानोलकर कुटुंब(का रे दुरावा) गोखले कुटुंब (होणार सुन मी ह्या घरची) ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या माजघरातील कुटुंब आणि ‘चला हवा येऊ द्या’ कुटुंब यांच्यामध्ये स्पर्धा होती. यामध्ये दिल दोस्ती दुनियादारीच्या कुटुंबाला सर्वाधिक पसंती देत सर्वोत्कृष्ट कुटुंबाचा मान प्रेक्षकांनी दिला. या स्पर्धेत सर्वात जास्त उत्सुकता होती ती लोकप्रिय मालिकेची. ‘का रे दुरावा’, ‘जय मल्हार,’ ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अस्मिता’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ अशा सहा मालिका यंदा स्पर्धेत होत्या. यासाठी ख-या अर्थाने चुरशीची स्पर्धा रंगली. खरं तर ही प्रेक्षकांसाठीही मोठी कसोटी होती कारण या सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये तेवढ्याच लोकप्रिय आहेत शिवाय त्यांच्या जिव्हाळ्याच्याही आहेत. या सर्वांत बाजी मारत ‘का रे दुरावा’ मालिकेने यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा बहुमान मिळवला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा मान ‘चला हवा येऊ द्या’ने मिळवला.

झी मराठी अवॉर्डचा हा देखणा कार्यक्रम याहीवर्षी रंगतदार ठरला तो कलाकारांच्या बहारदार आणि रंगतदार परफॉर्मन्सने. यातही सर्वांचं आकर्षण ठरला तो कपल अॅक्ट. झी मराठीवरील लोकप्रिय जोड्यांनी रोमॅंटिक गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय सर्वात धम्माल आणली ती नवरे, ललिता, वच्छी आत्या, संपदा आणि रजनी यांनी सादर केलेल्या धम्माल नृ्त्याने. सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ‘कल्लुळाचं पाणी’ आणि ‘शांताबाई’ या गाण्यांवर या सर्वांनी ठेका धरला आणि त्यांच्या सोबतीने सर्व प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. माजघरातील दोस्तांनी ‘जिंदगी जिंदगी’ आणि ‘करूया आता कल्ला कल्ला’ म्हणत प्रेक्षागृह दणाणून सोडले. कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते आशू आणि कैवल्यचे धम्माल निवेदन. केवळ पोडीयमच नव्हे तर संपूर्ण रंगमंचावर आणि सभागृहावर ताबा मिळवत या दोघांनी या सोहळ्यात आपल्या निवेदनाने, हजरजबाबीपणाने धम्माल रंग भरले. हा सोहळा येत्या १ नोव्हेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

--------------------