Sign In New user? Start here.

‘गोड संसारासाठी तिखट बनणा-या बायकोची गोष्ट

Chala Hawa Yeu Dya with Akshay Kumar
‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ‘रूस्तम’ अक्षय कुमार
LIGHT-HOUSE"
 
 

‘गोड संसारासाठी तिखट बनणा-या बायकोची गोष्ट

प्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं.. याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. नवरा बायकोच्या गोड संसारात जेव्हा नवऱ्यावर हक्क सांगणारी एखादी तिसरी व्यक्ती येते तेव्हा हक्काची बायको तिला नवऱ्यापासून दूर ढकलत तिचा तिरस्कार करते ? की संसारातील एक आव्हान म्हणून तिचा स्वीकार करते ? याची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. अभिजीत खांडकेकर अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका येत्या २२ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेची कथा आहे राधिका आणि गुरुनाथची. नागपूरहून मुंबईत आलेलं हे जोडपं. कॉलेजमध्ये शिकत असताना एकमेकांच्या प्रेमात पडलेले राधिका आणि गुरुनाथ विवाहबंधनात अडकतात. गुरु करिअरच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाकांक्षी तर राधिका अतिशय कर्तव्यदक्ष गृहिणी. नागपूरहून मुंबईत आले तेंव्हा मध्यमवर्गीय जीवन जगणारं हे जोडपं. परंतू, आता मात्र हे चित्र बदललंय कारण गुरुने त्याच्या व्यवसायात खुप प्रगती केलीये आणि आज तो एक यशस्वी उद्योजक बनलाय. राहण्यासाठी अलिशान अपार्टमेंटमधील तितकंच अलिशान घर, दिमतीला नोकर चाकर, गाड्या-घोड्या असं सर्व काही आहे. लग्नापूर्वीचा गुरु आणि आताचा गुरु यांच्यात खुप बदल झालाय.. पण राधिकामध्ये मात्र कोणताच बदल झालेला नाही. आजुबाजुच्या गोष्टी बदलल्या तरी आपण आपलं जगणं का बदलायचं ? या विचारांची अगदी साधी सरळ आणि मोकळ्या स्वभावाची गृहिणी अशी तिची ओळख. गुरुवर आणि आपला मुलगा अथर्ववर अतिशय प्रेम करणारी, केवळ रक्ताचीच नाही तर मानलेली नातीही जपणारी मुलगी. तिच्या या स्वभावामुळे केवळ आजुबाजुच्या घरातच नाही तर पूर्ण कॉलनीमध्ये ती लोकप्रिय आहे.

परंतू गुरुला तिचा हा स्वभाव तितकासा रुचत नाहीये. परिस्थितीनुसार आपणही बदलायला हवं आणि राहणीमानही बदलायला हवं अशा मताचा तो आहे. आपल्या बायकोला कंटाळवाणी समजणा-या गूरुच्या आयुष्यात एक नवी मुलगी आलीये.. शनया.. ही त्याच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. करिअरच्या बाबतीत अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या शनयाला स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करून घेणं नीट जमतं आणि गूरुचासुद्धा ती असाच वापर करत आहे. कामाच्या बाबतीतला प्रत्येक निर्णय गूरु तिलाच विचारून घेतो. साध्या सरळ गुरुनाथचा तिने पार मॉडर्न ‘गॅरी’ करून टाकलाय. थोडक्यात, ऑफिसमध्ये तिच्याशिवाय गूरुचं पानही हलत नाही. राधिका मात्र या नात्यापासून अनभिज्ञ आहे. आपल्या नवऱ्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो दुस-या मुलीचा विचारच करु शकणार नाही या भोळ्या समजुतीमध्ये अडकलेल्या राधिकाला एक दिवस गूरु आणि शनयाच्या बाबतीत कळतं आणि तिला मोठा धक्का बसतो. परंतू सर्व अडचणींवर समर्थपणे मात करणारी राधिका हे आव्हानही स्वीकारते आणि मग गुरुसमोर शनयाचं स्वार्थी रूप आणून तिला अद्दल घडविण्याचा निर्णय ती घेते. यामध्ये ती यशस्वी होते का गुरुला ती परत मिळवते का? या कामात तिच्या मदतीला कोण कोण धावून येतं ? राधिका कोण कोणत्या शक्कल लढवते ? या सा-यांची मजेदार गोष्ट म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका.

मालिकेत गुरुनाथच्या भूमिकेत अभिजीत खांडकेकर, राधिकाच्या भूमिकेत अनिता दाते तर शनयाच्या भूमिकेत रसिका धबडगावकर बघायला मिळेल. यासोबतच अरुण नलावडे, सुहिता थत्ते, श्वेता मेहंदळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या मालिकेची कथा रोहिणी निनावे आणि अभिजीत गुरु यांची आहे तर दिग्दर्शक केदार वैद्य आहेत. तेजेंद्र नेसवणकर यांच्या ट्रम्पकार्ड प्रॉडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. आपला संसार गोड करण्यासाठी थोडं तिखट होणा-या राधिकाची ही गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे येत्या २२ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.वा. फक्त झी मराठीवर.