Sign In New user? Start here.

“चला हवा येऊ द्या”

 
 

“चला हवा येऊ द्या”

मराठी चित्रपटांना आता चांगले दिवस आले आहेत... मराठी नाटकांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.. मराठी कलेचे झेंडे अटकेपार फडकत आहेत अशी चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला बघायला आणि वाचायलाही मिळते. पण यासोबतच मराठीची ही घोडदौड शहरी भागांपुरतीच मर्यादित आहे. तालुका किंवा ग्रामिण भागांपर्यंत अजूनही मराठी चित्रपट किंवा नाटके हव्या त्या प्रमाणात पोहचत नाहीत अशी ओरडही दुस-या बाजुन ऐकायला मिळते. आशय आणि विषयाच्या बाबतीत परीपूर्ण असणारे मराठी चित्रपट आणि नाटके मार्केटींग आणि प्रसिद्धीच्या बाबतीत कुठे तरी कमी पडतात ही खंत पण अनेकाच्या मनात दिसते.यासाठीच झी मराठी घेऊन येत आहे एक नवा कार्यक्रम ज्याद्वारे मराठी नाटक आणि चित्रपटांची हवा सर्वत्र पसरेल. “चला.. हवा येऊ द्या” असे या कार्यक्रमाचे नाव असून यात प्रत्येक भागात आगामी नाटक आणि चित्रपटाची टीम सहभागी होणार असून त्या कलाकृतीबद्दल धमाल गप्पा मारतील.

येत्या १८ ऑगस्टपासून दर सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. झी मराठीवर प्रसारित होणा-या या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत डॉ. निलेश साबळे तर त्याच्या सोबतीला भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव, मानसी नाईक, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके या विनोदाच्या हुकमी एक्क्यांचाही समावेश असणार आहे.मागच्या दशकभरातील मराठी चित्रपटांवर नजर टाकली तर त्याच्या यशाचा उंचावत जाणारा आलेख आपल्या सहज लक्षात येईल. कथा, पटकथा, तंत्रज्ञान, बजेट या सर्वच क्षेत्रात सरस ठरणारा मराठी चित्रपट आता व्यावसायिकदृष्ट्याही कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासोबतच नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर सारख्या शहरांमध्येही मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. असेच काहीसे चित्र मराठी नाटकांबद्दलही आहे.

लेखक - दिग्दर्शकांची एक नवी फळी जे एक नवा विचार घेऊन या क्षेत्रात येत आहेत त्यांच्या वेगळ्या दृष्टीमुळे हे सुगीचे दिवस आले आहेत. मराठी कलेच्या या वैभवात अजून भर पडण्यासाठी आणि ते प्रेक्षकांपर्यंत योग्य रितीने पोचवण्यासाठी झी मराठी वाहिनी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. झी मराठीच्या मालिकांमधून किंवा रिअॅलिटी शोजमधूनही मराठी चित्रपटांना प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम केलं आहे. जुन्या निवडक नाटकांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नक्षत्र मधून अनेक नाटकांचा नजराणा झी मराठीने रसिकांसाठी आणला. त्याच कामाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम. निलेश साबळे सूत्रधार असलेल्या या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असणार आहे निलेशचं कुटुंब. ज्यामध्ये त्याचे विसरभोळे वडील भाऊ कदम, फिल्मी भाऊ कुशल बद्रिके, गावाचे सरपंच भारत गणेशपुरे, सरपंचाची मुलगी श्रेया बुगडे आणि शेजारीण मानसी नाईक आदींचा समावेश असणार आहे. अशा या मॅड फॅमिलीमध्ये प्रत्येक आठवड्याला एखाद्या चित्रपट किंवा नाटकाची टीम पाहुणे म्हणून येणार आणि त्यातून उडणारी धमाल म्हणजे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम.

-----------