Sign In New user? Start here.

२२ ऑक्टोबरला होणार रहस्याचा उलगडा

ratries khel chale off air
२२ ऑक्टोबरला होणार रहस्याचा उलगडा
LIGHT-HOUSE"
 
 
 

२२ ऑक्टोबरला होणार रहस्याचा उलगडा

कोकणातील नाईक कुटुंब, त्यांचा वाडा, त्या वाड्यात घडणा-या गूढ गोष्टी, त्या मागचं रहस्याचं वलय आणि त्यातून मनात निर्माण होणारी भीती हा असा उत्कंठावर्धक खेळ घेऊन गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अतिशय वेगळ्या धाटणीचं कथानक, वेगवान पद्धतीने पुढे सरकणारी गोष्ट आणि सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. सुरुवातीच्या काळात वादात सापडूनही मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही उलट ही मालिका प्रत्येक भागागणिक बहरतच गेली. पहिल्या भागातच नाईक कुटुंबाचे प्रमुख अण्णांचा झालेला मृत्यू, त्यानंतर एकत्र आलेलं नाईक कुटुंब, त्या घरात घडत जाणा-या गूढ घटना, संपत्ती वाटपाचा वाद, नेने वकिलांचा झालेला खून, आईला दिसणारे अण्णा, अंधश्रद्धांना थारा न देणारी आणि वैज्ञानिक पद्धतीने गोष्टींचा पडताळा करणारी नीलिमा तर पोलिसी पद्धतीने धागेदोरे उलगडणारा विश्वासराव असे अनेक पदर पुढे या मालिकेशी जोडत गेले आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत गेले. नाईक कुटुंबांमध्ये चाललेल्या या रहस्यमयी खेळाचा सूत्रधार कोण आहे हा प्रश्न आता ऐरणीवर असतानाच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय याचा अर्थ लवकरच या प्रश्नाचा उलगडा होणार हे निश्चित. तो उलगडा येत्या २२ ऑक्टोबरच्या भागात होईल.

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सर्वार्थाने वेगळी होती. मुंबई पुण्यामध्ये चित्रीकरण न होता सलग पन्नास दिवस कोकणात राहून चित्रीकरण करणारी ही बहुधा पहिलीच मालिका. यातील बहुतेक सर्वच कलाकार नवीन होते. घरापासून दूर राहत या कलाकारांनी सावंतवाडी येथे मुक्काम हलवला आणि तेथून जवळच असलेल्या आकेरी गावातील या वाड्याला आपलं दुसरं घर बनवलं. मालिकेची लोकप्रियता जसजशी वाढत गेली तसतशी या कलाकारांची आणि त्या वाड्याची लोकप्रियता वाढलीच शिवाय त्याची चर्चाही पंचक्रोशीत व्हायला लागली. हा वाडा लोकांचं आकर्षण ठरला आणि या वाड्यात चालणारं चित्रीकरण बघण्यासाठी दूरवरुन येणा-या चाहत्यांच्या गर्दीमध्ये वाढही झाली. अशीच गर्दी सावंतवाडीच्या त्या हॉटेलमध्येही वाढतच होती जिकडे हे सर्व कलाकार वास्तव्यास होते. या कलाकारांना स्थानिक लोक मालिकेतील नावांनीच बोलायचे आणि आता तीच त्यांची ओळखही बनली .

यातील सुहास शिरसाट, नुपूर चितळे, ऋतुजा धर्माधिकारी हे कलाकार मुळचे मराठवाड्यातले त्यामुळे मालवणी भाषेशी त्यांचा तसा फारसा संबंधही नव्हता आला. परंतु या मालिकेद्वारे त्यांनी मालवणीचे धडेही गिरवले आणि आता कोकणाला आपल्या हृदयात सामावून ते या सर्वांना निरोप देत आहेत. जी गोष्ट यांची तीच बाकी कलाकारांचीही. माधव, नीलिमा, आई, अभिराम, नाथा, पूर्वा, आर्चिस, सुषमा, सरिता, छाया ही सर्व मंडळी केवळ मालिकेतच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही एक कुटुंब म्हणूनच तिथे वावरली. यातही विशेष लोकप्रियता मिळाली ती पांडूची भूमिका करणा-या प्रल्हाद कुडतरकरला. पांडूचा विक्षिप्तपणा, त्याचं खुळ्यागत हसणं, त्याचं बोलणं, गोष्टी विसरणं हे सर्वच प्रेक्षकांना मनापासून भावलं. विशेष म्हणजे ही भूमिका करणारा प्रल्हाद या मालिकेचा संवादलेखकही आहे. त्याच्या मते या मालिकेने एका लेखकाला चेहरा मिळवून दिला ही खूप समाधानाची बाब आहे.

रहस्य हे उत्कंठा वाढवणारं असावं आणि ते वेळेत उलगडणारं असावं. ही उत्कंठा जास्त ताणणंही कधी कधी रसभंग करणारी ठरु शकते. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता या मालिकेचा रहस्य उलगडण्याचा प्रवास सुरु झाला आहे. विशेष म्हणजे हा शेवट काय असेल याची कल्पना यातील कलाकारांनासुद्धा नाहीये. कारण मालिकेच्या दिग्दर्शकाने प्रत्येक पात्रासोबत एक वेगळा शेवट चित्रीत केला आहे त्यामुळे नेमका सूत्रधार कोण? याची उत्सुकता सामान्य प्रेक्षकांइतकीच या कलाकारांनाही आहे हे विशेष. या रहस्याचे एक एक पदर आता उलगडत जातील आणि येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत त्यावरचा पडदा उठेल.