Sign In New user? Start here.
Unch Majha Zoka Puraskar 2015
जगण्याची नवी उर्मी देणारा झी मराठीचा उंच माझा झोका पुरस्कार
3d rock concert at pune"
 
 

जगण्याची नवी उर्मी देणारा उंच माझा झोका पुरस्कार - ज्येष्ठ समाजसेवी मीराताई लाड

“कुष्ठरोगी, आदिवासी, शारीरिक व मानसिक अपंगत्व असलेल्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मी आणि माझे सहकारी काम करत आहोत. एका अर्थाने समाजासाठी कायम दुर्लक्षित असणा-या घटकाची आणि आमच्या कामाची एवढ्या मोठ्या पातळीवर दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातोय याचा विशेष आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे आता माझ्यासह सर्वांनाच हे काम अजून जोमाने करण्याची आणि जगण्याची एक नवी उर्मी मिळाली आहे. हा पुरस्कार माझा एकटीचा नसून माझ्यासोबतीने राबणा-या असंख्य हातांचा आहे” असे मनोगत ज्येष्ठ समाजसेवी मीराताई लाड यांनी व्यक्त केले. निमित्त होते, त्यांना प्रदान करण्यात आलेल्या झी मराठीच्या ‘उंच माझा झोका जीवनगौरव’ पुरस्काराचे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पनवेल येथील कुष्ठरोग निवारण समितीचा शांतिवन प्रकल्प, आदिवासी मुलांसाठीच्या आश्रमशाळा आणि राजीव-रंजन आधार केंद्र संस्थेद्वारे अपंग, वृद्धांना हक्काचं घर आणि माया देण्याचं काम गेली अनेक वर्षे मीराताई लाड अव्याहतपणे करत आहेत. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना यंदाच्या उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येत्या १३ सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीवर हा पुरस्कार सोहळा प्रसारित होईल.

विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्याही पेक्षा एक पाऊल पुढे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या आणि प्रसिद्धीचा सोस न बाळगता अव्याहतपणे आपले कार्य करणा-या कितीतरी महिला आपल्या आजुबाजूला आहेत. परंतु त्यांच्या कामाची दखल प्रत्येक वेळी घेतली जातेच असे नाही. अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका पुरस्कार’ या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरूवात केली. यंदा या पुरस्काराचं तिसरं वर्ष आणि याही वर्षी समाजकारण, शिक्षण, कला , क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, साहित्य अशा विविध क्षेत्रांत केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या दहा कर्तृत्वशालिनींचा गौरव करण्यात आला.

अमरावतीमध्ये तृतीयपंथी, समलैंगिक, देहविक्रय करणा-या महिला, महिला कैदी यांना सन्मानाने जगता यावे म्हणून ‘मानव संवाद केंद्राच्या’ माध्यमातून काम करणा-या रझिया सुलताना यांना सामाजिक कार्यासाठी तर धूर विरहीत चूल बनवणा-या डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांना पर्यावरण जागृतीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावरपाड्यासारख्या छोट्याश्या खेड्यातून मोठी झेप घेत खेळाचे आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणा-या धावपटू कविता राऊत यांना क्रीडा विभागासाठी तर ज्येष्ठ लेखिका, कवयित्री कविता महाजन यांना साहित्य विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

पुणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी असणा-या वैशाली बारये हा पुरस्कार स्वीकारताना म्हणाल्या की, “हे काम जरी स्वच्छतेचं असलं तरी या कामाकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र अजूनही दुषितच आहे. स्वच्छता करतो ते वाईट की जे ही घाण करतात ते वाईट ? आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाहीये का?” असे प्रश्न विचारून त्यांनी सर्वांनाच निरूत्तर केले. गेल्या वर्षी मुंबईतील लोकल अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेने हा पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या मनोगतात “ कितीही संकटे आली तरी हार मानू नये. आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि मी ते तेवढ्याच आनंदाने जगणार आहे” असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने तिच्या जिद्दीचं कौतुक केलं. तर स्मशानभूमीत राहून जीवन जगणा-या मसणजोगी समाजातील पूजा घनसरवाडने घरात दिव्यांसोबतच अज्ञानाचा अंधार असताना चितेच्या प्रकाशात अभ्यास करून दहावीत ९१ % गुण मिळवले. तिच्या संघर्षाची कहाणी ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

याशिवाय एअरोस्पेस इंजिनियरिंगची पदवी मिळवून ‘नासा’मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी युवा शास्त्रज्ञ स्वीटी पाटेला विज्ञान विभागासाठी सन्मानित करण्यात आले तर अत्याचारग्रस्त महिलांसाठी नेटाने लढणा-या आणि कुमारी मातांना आधार देणा-या नागपूरच्या डॉ. सीमाताई साखरे यांच्या ‘स्त्री अत्याचार विरोधी परिषद’ या संस्थेचाही गौरव यावेळी करण्यात आला. अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या पुरस्कार सोहळ्याचे निवेदन केले. येत्या १३ सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. हा "उंच माझा झोका पुरस्कार सोहळा" झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

--------------------