Sign In New user? Start here.

कर्तव्यदक्ष महिला अधिका-याचा सन्मान करता येणं हा माझा सन्मान - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

uncha majha zhokha purskar 2016
‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ‘रूस्तम’ अक्षय कुमार
LIGHT-HOUSE"
 
 

कर्तव्यदक्ष महिला अधिका-याचा सन्मान करता येणं हा माझा सन्मान - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

स्त्री कर्तृत्वाविषयीची जाणीव ठेवत त्यांच्या कार्याची केवळ दखलच घेणारा नाही तर त्यांना सन्मानित करणा-या या सोहळ्यात सहभागी होऊन स्वाती साठे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महिलेचा सन्मान करण्याचं भाग्य मला मिळालं. कारागृहातील कैद्यांना कडक शिस्तीसोबतच मायेचा ओलावा देण्याचं काम स्वाती साठे आजवर करत आल्या आहेत. त्यांचा सन्मान करता येणं हा मी माझा सन्मान समजतो अशी हृद्य भावना राज्याचे गृहराज्यमंत्री मा. दीपक केसरकर यांनी झी मराठीच्या ‘उंच माझा झोका पुरस्कार’ सोहळ्यात व्यक्त केली. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमात येरवाडा कारागृहाच्या उप महा निरीक्षक स्वाती साठ्येंसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. येत्या २८ ऑगस्टला सायंकाळी ७ वा. हा पुरस्कार सोहळा झी मराठीवरून प्रसारित होणार आहे. विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्याही पेक्षा एक पाऊल पुढे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या आणि प्रसिद्धीचा सोस न बाळगता अव्याहतपणे आपले कार्य करणा-या कितीतरी महिला आपल्या आजुबाजूला आहेत. परंतु त्यांच्या कामाची दखल प्रत्येक वेळी घेतली जातेच असे नाही.

अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका पुरस्कार’ या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरूवात केली. यंदा या पुरस्काराचं हे चौथं वर्ष आणि याही वर्षी समाजकारण, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, अशा विविध क्षेत्रांत केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या कर्तृत्वशालिनींचा गौरव करण्यात आला. ज्यामध्ये पर्यावरण क्षेत्रासाठी उषा मडावी, आरोग्या आणि विज्ञान क्षेत्रासाठी डॉ. स्मिता लेले, सामाजिक क्षेत्रासाठी प्रीती पाटकर आणि स्वाती साठ्ये, क्रीडा क्षेत्रासाठी तारामती मतीवाडे, कृषी क्षेत्रासाठी कविता जाधव बिडवे यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच गृहीणींच्या आरोग्यापासून ते ग्रामविकासाचे व्रत घेऊन झटणारे आणि उंब-याच्या आतील विकासासोबतच उंब-याबाहेरचाही विकास करणारे डॉ. हर्षदा आणि डॉ. प्रसाद देवधर या दाम्पत्याच्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचाही सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.

नसिमादीदी हुरझूक यांना जीवनगौरव

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंगांच्या पुनर्वसनासाठी गेली चार दशके अथक परिश्रम घेणा-या नसीमा हुरझूक यांना यंदाच्या उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. स्वतःच्या अपंगत्वावर मात करून नसीमादीदीनी समाजातील अनेक अपंगांना छातीशी कवटाळले आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांच्या जगण्याला आकार देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे त्या या समारंभाला उपस्थित राहू शकणार नव्हत्या त्यामुळे त्यांच्या संस्थेमध्ये जाऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. दि गोवा हिंदू असोसिएशनचे प्रमुख आणि यंदाचे झी नाट्य जीवनगौरव पुरस्कराचे मानकरी ठरलेले रामकृष्ण नायक यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.“सन्मान तिचा अभिमान सर्वांचा” असं ब्रीद असलेला हा ‘उंच माझा झोका पुरस्कार’ सोहळा येत्या २८ ऑगस्टला झी मराठीवरुन सायंकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे.

पुरस्कारांचे मानकरी आणि मान्यवरांच्या प्रतिक्रिया

तारामती मतीवडे - नौकानयन किंवा यॉटींगसारख्या क्रीडा प्रकाराबदद्ल आपल्याकडे फारशी माहिती नाहीये. पूर्वीपासूनच काही तरी वेगळं करायचं ही जिद्द मी बाळगली होती. पोहण्याची आवड होतीच त्यासोबतीने यॉटींगचे धडेही गिरवले. या प्रवासात खुप अडचणी आल्या अडथळे आले परंतु ती सर्व आव्हाने स्वीकारत पुढे जातच राहिले. दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय यॉटींग स्पaर्धेत केवळ भारतीयच नाही तर एकमेव महिला स्पर्धक म्हणून सहभागी झाले आणि ही स्पर्धाही जिंकली. जिथे आपला देश पोहोचला नाही तिथे त्याला घेऊन जायचं हीच इच्छा कायम मनाशी बाळगलेली आहे. आजवर अनेक ठिकाणी कौतूक झालं परंतू आजचा हा सोहळा माझ्यासाठी खुप विशेष आहे. या सन्मानाने आता पुढच्या वाटचालीसाठी एक नवी उर्जा मिळाली आहे.

डॉ. हर्षदा देवधर - भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून अनेकविध गावांशी जोडल्या गेलो. आज या संस्थेच्या माध्यमातून हजारो लोक एकत्र येऊन ग्रामविकासासाठी झटत आहेत. स्वच्छतेपासून ते पर्यावरणाच्या रक्षणापर्यंतची जाकरूकता त्यांच्यात निर्माण होतेय. ही मंडळी सोबत आहेत म्हणूनच हे कार्य घडू शकलं त्यामुळे हा सन्मान आमच्या संस्थेतील प्रत्येक सदस्याचा आहे.

नागराज मंजुळे - या सोहळ्यात मानकरी ठरलेल्या प्रत्येक महिलेचं काम बघितल्यावर आपल्या छोटेपणाची जाणीव होते. तारामती मतीवडेंचा सन्मान माझ्या हस्ते होतोय हा खरं तर मी माझा सन्मान समजतो. आपल्याकडे एकूणच जगण्यात फार फिल्मीपणा आहे त्यामुळे फिल्मी लोकांना आपण आदर्श मानतो परंतु तारामती सारख्या खेळाडू आणि इथे सन्मानित झालेल्या प्रत्येक महिला ज्या समाज घडवण्याचं आणि बदलण्याचं काम करतायत त्या ख-या आदर्श आहेत.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर - जैवतंत्र अभियंता आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञ असलेल्या डॉ. स्मिता लेले यांचं काम मी अनेक वर्षांपासून बघतोय. त्यांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी गौरवास्पद आहे. आजच्या फास्ट फूडच्या युगात रासायनिक प्रक्रियारहित आरोग्यदायी रसांचा (ज्युस) चा पर्याय त्यांनी उपलब्ध करुन दिलाय. या मंचावरुन त्यांच्या या कामाचा गौरव झाल्यामुळे त्यांचं हे काम अनेक लोकांपर्यंत पोहचेल असा विश्वास आहे.