Sign In New user? Start here.
Zee Chitra Gaurav 2015

झी मराठीचे यंदाचे ‘गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी चित्रगौरव पुरस्कार’ अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. मराठी कलांगणात आपल्या तेजाने लखलखणा-या या देदीप्यमान सोहळ्यात मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार असणा-या लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, याच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला..

"Zee Marathi New Serial Ase He Kanyadaan"

 
 

झी चित्रगौरव पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘एलिझाबेथ एकादशी’ला

झी मराठीचे यंदाचे ‘गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी चित्रगौरव पुरस्कार’ अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. मराठी कलांगणात आपल्या तेजाने लखलखणा-या या देदीप्यमान सोहळ्यात मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार असणा-या लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, याच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. मराठी तारांगणातील लखलखत्या ता-यांच्या विशेष उपस्थितीत आणि सिनेरसिकांच्या अलोट गर्दीत वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर हा सोहळा शुक्रवार १३ मार्चला शानदाररित्या संपन्न झाला. यावर्षी चित्रपट रसिकांची आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळवलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला तर विशेष ज्युरी पुरस्कार मिळवत ‘किल्ला’ने एकूण सहा पुरस्कार पटकावले. मराठी चित्रपटाची गगनभरारी अशी यावर्षीची संकल्पना असलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी खास विमानाची भव्यदिव्य प्रतिकृती मंचावर उभारण्यात आली होती. ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यांच्यासह संदिप पाठक, हेमांगी कवी यांच्या धम्माल स्किट्स, लोकप्रिय नायिकांच्या नृत्याच्या दिलखेचक अदा आणि डॉ. निलेश साबळे व सई ताम्हनकर यांचं खुमासदार सूत्रसंचालन याने कार्यक्रमात जोरदार रंगत आणली.

झी गौरव पुरस्कारामध्ये यावर्षी पासून चित्रपटांसाठी चित्रगौरव आणि नाटकांसाठी नाट्यगौरव असे दोन वेगळे पुरस्कार सोहळे आखले गेले त्यापैकी चित्रगौरवचा सोहळा शुक्रवार १३ मार्चच्या संध्याकाळी पार पडला. यावर्षी चित्रगौरवसाठी एकूण ६१ चित्रपटांची एन्ट्री झाली होती. यात प्रामुख्याने ‘लय भारी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘क्लासमेट्स’, ‘पोश्टर बॉईज’, ‘लोकमान्य - एक युगपुरूष’ या चित्रपटांमध्ये चुरशीची टक्कर होती. आपलं सगळंच लय भारी म्हणत यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री घेणा-या रितेश देशमुखला ‘लय भारी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सुबोध भावेला विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. ‘तिचा उंबरठा’ चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी तेजस्विनी पंडितने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ‘किल्ला’ चित्रपटातील संवेदनशिल अभिनयासाठी अमृता सुभाषने विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृट चित्रपटासाठी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘लय भारी’, ‘लोकमान्य - एक युगपुरूष’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटांमध्ये चुरस होती यात ‘एलिझाबेथ एकादशी’ ने सरशी घेत बाजी मारली.

कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो जीवनगौरव पुरस्कार प्रदानाचा क्षण. आपल्या ठसकेबाज आवाजाने मराठी लावणीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणा-या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना यावर्षीचा चित्रजीवन गौरव पुरस्कार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, एन. चंद्रा ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कमलाकार सोनटक्के यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना विनोद तावडे म्हणाले की, “एखादा शास्त्रीय गायक ‘बडा ख्याल’ ज्या तब्येतीने गातो त्याच तब्येतीने आणि भक्तीभावाने सुलोचनाताई लावणी गातात. एके काळी उंबरठ्याबाहेर असणारी लावणी दिवाणखान्यात आली आणि मराठी घरातली महिला माजघरातसुद्धा ती लावणी गुणगुणायला लागली याचं श्रेय सुलोचनाताईंनाच आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतांना सुलोचनाताई म्हणाल्या की, “माझी कारकीर्द घडविण्यात अनेक संगीतकारांचा मोलाचा वाटा आहे. मला आजवर मराठीसोबतच ज्या हिंदी, गुजराती, तेलगू, आणि पंजाबी संगीतकारांनी गाण्याची संधी दिली त्यां सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आज मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार मला लावणीचा खरा बाज देणारे माझे पती शामराव चव्हाण यांचा आशीर्वाद आहे असे मी मानते. कलाकारांचे मायबाप हे रसिक श्रोते असतात त्यांनी पसंतीची पावती दिल्यामुळेच कोणताही कलाकार मोठा होतो. आजवर मला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी, आशीर्वादासाठी मी तुम्हा सर्व रसिकांचे आभार मानते आणि तुम्हाला विनम्र अभिवादन करते.”

यावेळी सुलोचनाताईंनी प्रेक्षकांच्या विनंतीवरून “फड सांभाळ तु-याला गं आला” ही लावणी त्याच सदाबहार अंदाजात गायली आणि ख-या कलाकाराला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं. त्यांच्या आवाजाने रोमांचित झालेल्या समस्त प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांना अभिवादन केले. तत्पूर्वी सुलोचनाबाईंच्या लोकप्रिय लावण्यांवर सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिर्मुले, मानसी नाईक, पूजा सावंत आणि स्मिता तांबे यांनी बहारदार नृत्यही सादर केलं.मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांसह हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेला झी चित्रगौरवचा हा शानदार सोहळा लवकरच झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

 

--------------------