Sign In New user? Start here.

झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ ची बाजी

zee gaurav puraskar 2016 best film katyar
झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ ची बाजी
LIGHT-HOUSE"
 
 

"झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ ची बाजी

रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, भव्य दिव्य मंचावर सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार, प्रेक्षकांमधून मिळणारी प्रचंड दाद, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती, जीवनगौरव पुरस्कारावेळी भारावून गेलेल्या समस्त प्रेक्षकांनी दिेलेली मानवंदना अशा भारावून टाकणा-या वातावरणात झी चित्र गौरव २०१६ पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात मुंबईतील बांद्रा – कुर्ला संकुलाच्या मैदानावर पार पडला. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या बहुमानासह इतर अनेक पुरस्कारांवर ‘कट्यार काळजात घुसली’ने आपली ठसठशीत मोहोर उमटवली तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नाना पाटेकर आणि दिग्दर्शनासाठी महेश मांजरेकर या पुरस्कारांसहित इतरही मानाचे पुरस्कार पटकावित ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ चित्रपटानेही या पुरस्कारांवर आपली छाप सोडली. अतिशय दिमाखदार पद्धतीने रंगलेला झी चित्रगौरवचा हा शानदार सोहळा येत्या २० मार्चला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रेक्षेपित होणार आहे.

भाषा, संस्कृती आणि प्रांताच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचलेल्या मराठी चित्रपटांचा गौरव अशी संकल्पना असलेल्या या सोहळ्याची नेपथ्य रचनाही त्या संकल्पनेला साजेशी अशी डोळे दिपवून टाकणारी होती. यावर्षीच्या स्पर्धेत प्रामुख्याने चुरस होती ती ‘डबल सीट’, ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ या चित्रपटामध्ये. यामध्ये नेमका कोणता चित्रपट बाजी मारतो याकडे चित्रपट क्षेत्रातील मंडळींसह प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता होती. या सर्वांत सरशी केली ती ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृ्ष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटन, सर्वोत्कृष्ट वेशभूषा या पुरस्कारांवर ‘कट्यार..’ने आपले नाव कोरले.

याशिवाय विशेष ज्युरी पुरस्कारांमध्ये अभिनेत्याचा पुरस्कार ‘कट्यार..’ मध्ये खॉंसाहेबांची भूमिका रंगविणारे सचिन पिळगावकर यांना तर पदार्पणातच ‘कट्यार..’सारखा विषय पेलणा-या सुबोध भावेंना दिग्दर्शकाचा विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या बहारदार गायकीने रसिकांची मने जिंकणा-या राहूल देशपांडे आणि महेश काळे या दोघांनीही या विशेष ज्युरी पुरस्कारावर आपले नाव कोरले. याच विभागात अभिनेत्रीचा पुरस्कार स्मिता तांबेला ‘परतु’ चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला तर गार्नियर नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर या विशेष पुरस्काराने अभिेनेत्री अमृता खानविलकरला कट्यार.. मधील भूमिकेसाठी गौरविण्यात आले. याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिेनेते नाना पाटेकर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक महेश मांजरेकर या मानाच्या पुरस्कारांसह ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट रंगभूषा, संवाद, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री या पुरस्कारांवर ठसठशीत मोहोर उमटवत आपला दबदबा कायम राखला. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मुक्ता बर्वेला डबल सीट चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला.

लीलाताई गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार

आपल्या भरीव कामगीरीने मराठी चित्रपटसृष्टीसाठीसाठी मोलाचे योगदान देणा-या कलावंताला दरवर्षी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यावर्षी हा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यसम्राज्ञी लीला गांधी यांना प्रदान करण्यात आला. ‘सांगत्ये ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘पडछाया’, ‘चोरावर मोर’, ‘संत गोरा कुंभार’, ‘सुशीला’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत ते लीला गांधी यांच्या अविस्मरणीय नृत्यामुळे. आजवर लीलाताईंनी एकूण ७५ चित्रपटांत भूमिका केल्या. ज्यापैकी ‘कार्तिकी’ आणि ‘पैज’ सिनेमासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखिल मिळाले आहेत. आजवर लीलाताईंना महाराष्ट्र शासनाचा मानाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, पु. ल. देशपांडे स्मृती पुरस्कार, दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार, असे चाळीसपेक्षा जास्त पुरस्कार लाभलेले आहेत. त्यांच्या याच देदीप्यमान कारकिर्दीसाठी यंदाचा झी जीवनगौरव पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार लीलाताईंना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “लीलाताईंसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीने आजवर मराठी चित्रपटसृ्ष्टीला मोलाचे योगदान दिले आहे. या पुरस्काराने लीलाताईंचा सन्मान झाला तेवढाच सन्मान या पुरस्काराचाही झाला. लीलाताईंच्या नावामुळे या पुरस्कारालाा एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्याचा सन्मान मला मिळाला हे मी माझे भाग्यच समजतो.”

हा पुरस्कार स्वीकारतांना लीलाताई म्हणाल्या की, “आजवर अनेक पुरस्कारांनी माझा सन्मान करण्यात आला परंतु हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. माझ्या एकूण कारकिर्दीत ज्या ज्या मोठ्या लोकांनी मला तोलोमोलाची साथ दिली त्या सर्वांना आणि माझ्या प्रेक्षकांना हा पुरस्कार मी अर्पण करते.”

जीवनगौरव पुरस्करांच्या आधी लीलाताईंच्या बहारदार लावण्यांवर भार्गवी चिरमुले, मेधा घाडगे, सोनाली खरे, श्रुती मराठे यांनी दिलखेचक नृत्ये सादर केले.

कार्यक्रमाचे आकर्षण ठरली ते डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या खुमासदार निवेदनाची चौफेर फटकेबाजी. मराठी चित्रपटसृष्टीच्या मांदियाळीत रंगलेला झी चित्रगौरवचा हा बहारदार सोहळा रविवार २० मार्चला झी मराठीवरून सायंकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे.

--------------------