Sign In New user? Start here.

झी गौरव पुरस्कार २०१५ नामांकने जाहीर

Zee Gaurav Pursakar Nominations 2015

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाचा समजल्या जाणा-या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकने एका रंगतदार कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहेत.

"Zee Gaurav Pursakar Nominations 2015"

 
 

झी गौरव पुरस्कार २०१५ नामांकने जाहीर

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाचा समजल्या जाणा-या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकने एका रंगतदार कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये यावर्षी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि समीक्षकांनी गौरविलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ने १३ नामांकने मिळवत आघाडी घेतली आहे तर यंदा ब्लॉकबस्टर हिट ठरलेल्या ‘लय भारी’ने तब्बल १२ विभागात नामांकने मिळवली. याशिवाय ‘लोकमान्य-एक युगपुरूष’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘क्लासमेट्स’नेही महत्त्वाच्या विभागांमध्ये नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे. व्यावसायिक नाटकांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित भरत जाधव अभिनित ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाला सर्वात जास्त ९ नामांकने मिळाली असून संजय खापरे अभिनित ‘कळत नकळत’ या नाटकाने ८ नामांकने मिळवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये ‘ती’, ‘गोष्ट सिंपल पिलाची’ आणि ‘झोपाळा’ या नाटकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे. यावर्षी रंगणा-या झी गौरव पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी चित्रपटासाठी ‘चित्रगौरव’ आणि नाटकांसाठी ‘नाट्यगौरव’ असे दोन वेगवेगळे रगंतदार सोहळे होणार आहेत. यातील ‘चित्रगौरव’ येत्या १३ मार्चला तर ‘नाट्यगौरव’ २६ मार्चला आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची महावाहिनी असलेल्या झी मराठीचा हा झी गौरव पुरस्कार सोहळा हा मराठी मनाचा जणू मानबिंदू ! वर्षभरात प्रदर्शित होणारे अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट आणि दर्जेदार नाटकांचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा. या कलाकृतींबरोबरच ती घडण्यामागे हातभार लागलेल्या अनेक महत्त्वांच्या विभागांची, कलाकारांची आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीची कार्याची दखल घेणारा पुरस्कार सोहळा अशी झी गौरवची ओळख आहे. आपल्या दशकभराहून अधिकच्या प्रवासात झी गौरव पुरस्काराने चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये विश्वासाचं आणि मानाचं स्थान मिळवलं आहे.

यावर्षीच्या झी गौरव पुरस्कारासाठी मराठी चित्रपट विभागाकरिता जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत झालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला तर नाटकांमध्ये याच कालावधीत रंगभूमीवर दाखल झालेली नाटके (पुनरूज्जीवित नाटके वगळता) प्रवेशासाठी पात्र होती.

यावर्षी चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि विद्याधर पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात संजय मोने, स्वाती चिटणीस आणि रविंद्र दिवकेर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी डॉ. अनिल बांदिवडेकर, विजय केंकरे आणि प्रदीप राणे यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.

 

--------------------