Sign In New user? Start here.

झी मराठी अवॉर्ड्स २०१५ साठी रंगणार एकदिवसीय मतदान

Zee Marathi Awards 15 - One Day Voting
झी मराठी अवॉर्ड्स २०१५ साठी रंगणार एकदिवसीय मतदान
3d rock concert at pune"
 
 

झी मराठी अवॉर्ड्स २०१५ साठी रंगणार एकदिवसीय मतदान

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्डस्. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. या पुरस्कारांचं वैशिष्ट्य म्हणजे यातील विजेत्यांची निवड ही प्रेक्षकांच्या मतदानाद्वारे करण्यात येते. यावर्षी हे मतदान एकाच दिवशी म्हणजे शनिवार ३ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील २० मुख्य शहरांमध्ये होणार आहे. या शहरांमधील विविध ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार असून त्याद्वारे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकार आणि मालिकेला मत देता येणार आहे.

झी मराठीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’ मधील श्री आणि जान्हवी, ‘का रे दुरावा’ मधील जय – अदिती, ‘नांदा सौख्य भरे’ मधील नील आणि स्वानंदी या सर्वांवर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेक्षक जीवावापड प्रेम करतात. ‘जय मल्हार’ ही खंडेरायाची मालिका भक्तीभावाने बघतात. ‘होम मिनिस्टर’ मधून घरोघरी जाणारे आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी बनलेले आहेत तर ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरांत मनोरंजनाची आणि हास्याची हवा पसरलेली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारीतील’ मित्रांचं ‘माजघर’ आणि त्यातील किस्से सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे. याच आणि इतर लोकप्रिय कार्यक्रमांना आणि त्यातील कलाकारांना सर्वोत्कृष्ट ठरवण्याचा सन्मान प्रेक्षकांच्या मतदानातून होणार आहे. यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, धुळे, नगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, परभणी, नागपूर, अमरावती, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण आणि रत्नागिरी या शहरांमधून एकूण ७२ केंद्रांवर हे मतदान घेण्यात येणार आहे. शनिवारी ३ ऑक्टोबर या एकाच दिवशी हे प्रत्यक्ष मतदान रंगणार आहे.

याशिवाय ज्यांना ३ तारखेला मतदान करता आलं नाही त्या प्रेक्षकांना आणि इतर शहरातील प्रेक्षकांना ऑनलाईन मतादानाचाही पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी झी मराठीच्या www.zeemarathi.com या संकेतस्थळावर नामांकनपत्रिकेद्वारे हे मतदान करता येणार आहे. याशिवाय पाच महत्त्वांच्या विभागांसाठी फ्री मिस्ड् कॉलद्वारेही मतदान करता येऊ शकेल. ज्यामध्ये मालिकेसाठी 9021103601, कथाबाह्य कार्यक्रमासाठी 9021103602, नायकासाठी 9021103603, नायिकेसाठी 9021103604 , जोडीसाठी 9021103605 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास मतदान करण्यासाठी या क्रमांकावरून कॉल येईल जिथे प्रेक्षक आपलं मत नोंदवू शकतील. याशिवाय एसएमएसचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरला झी मराठी अवॉर्ड्सचा हा सोहळा रंगणार असून १ नोव्हेंबरला तो प्रसारित होणार आहे.

--------------------