Sign In New user? Start here.

झी मराठी अवॉर्ड २०१५ यावर्षीही रंगणार चुरशीची स्पर्धा.

Zee Marathi Awards 2015
झी मराठी अवॉर्ड्स २०१५ साठी रंगणार एकदिवसीय मतदान
3d rock concert at pune"
 
 

झी मराठी अवॉर्ड २०१५ यावर्षीही रंगणार चुरशीची स्पर्धा.

झी मराठी आणि महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे एक अतूट नाते आहे. झी मराठीवरील व्यक्तिरेखांशी याच मायबाप रसिकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. किंबहूना या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. म्हणूनच आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांवर झी मराठी अवॉर्डमध्ये आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवून त्यांना जिंकवून देण्यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुक असतात. यंदाच्या वर्षी रसिकांनी लोकप्रियतेचे दान कुणाच्या पदरी टाकले ? प्रेक्षकांची लाडकी जोडी कोण ठरणार? यंदाची सर्वाधिक आवडती मालिका कुठली? याबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीये. कोण होणार झी मराठी अवॉर्डचे मानकरी याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.

यावर्षी पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरण्यात आलेली विविध माध्यमे आणि राज्यातील मोठ्या शहरांसोबतच छोट्या गावातील प्रेक्षकांचा सहभाग. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, धुळे, नगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, परभणी, नागपूर, अमरावती, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण आणि रत्नागिरी या २० शहरांतील एकूण ७२ केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रांवर सुमारे ५० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला. या शिवाय फ्री मिस्ड् कॉल वोटींग, एसएमएस आणि ऑनलाइन वोटींगद्वारे सुमारे ५ लाखांहून जास्त प्रेक्षकांनी आपले आवडते कलाकार आणि आवडत्या मालिकेसाठी मत नोंदविले.

झी मराठीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’ मधील श्री आणि जान्हवी, ‘का रे दुरावा’ मधील जय – अदिती, ‘नांदा सौख्य भरे’ मधील नील आणि स्वानंदी या सर्वांवर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेक्षक जीवावापड प्रेम करतात. ‘जय मल्हार’ ही खंडेरायाची मालिका भक्तीभावाने बघतात. ‘होम मिनिस्टर’ मधून घरोघरी जाणारे आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी बनलेले आहेत तर ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरांत मनोरंजनाची आणि हास्याची हवा पसरलेली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील मित्रांचं ‘माजघर’ आणि त्यातील किस्से सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे. याच आणि इतर लोकप्रिय कार्यक्रमांना आणि त्यातील कलाकारांना सर्वोत्कृष्ट ठरवण्याचा सन्मान प्रेक्षकांच्या मतदानातून झाला. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट नायक-नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासू-सासरे, सर्वोत्कृष्ट आई-वडील, सर्वोत्कृष्ट स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट खलभूमिका, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत, सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक, सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट मालिका आदि विभागांचा समावेश आहे.

यावर्षी सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी ‘जय मल्हार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘का रे दुरावा’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ यांत चुरस रंगणार असून सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमासाठीची स्पर्धा ‘होम मिनिस्टर’, ‘आम्ही सारे खवय्ये’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगणार आहे. सर्वोत्कृष्ट नायकाच्या मानासाठी खंडोबा, नील जहागिरदार, श्रीरंग गोखले, जयराम खानोलकर यांना नामांकने मिळाले असून म्हाळसा, बानू, स्वानंदी, जान्हवी, अदिती आणि अस्मिता यांच्यामधून सर्वोत्कृष्ट नायिकेची निवड होणार आहे. याशिवाय इतर महत्त्वांच्या विभागांमध्ये अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांचा समावेश आहे. यावर्षीच्या रंगतदार सोहळ्याचं निवेदन ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील कैवल्य आणि आशुतोष ही जोडगोळी करणार असून आपल्या खुमासदार शैलीने या सोहळ्यात ते हास्याचे आणि मैत्रीचे विविध रंग भरणार आहेत. येत्या १ नोव्हेंबरला हा सोहळा झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

--------------------