Sign In New user? Start here.
Zee Marathi's New Show - Kahe Diya Pardes
झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ ची बाजी
LIGHT-HOUSE"
 
 

भाषा आणि संस्कृतींचा मिलाफ घडवून आणणा-या प्रेमाची गोष्ट

प्रेम ही भावना वैश्विक आहे कारण प्रेमाला कोणत्याही सीमांमध्ये बांधता येत नाही. भाषा, वर्ण, जात, धर्म, प्रांत या सर्वांच्या पल्याड जाऊन लोकांना मनाने जे जोडते तेच खरे प्रेम असते. अशाच प्रेमाची एक आगळी वेगळी गोष्ट आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीवर नव्याने सुरू होत असलेल्या काहे दिया परदेस या मालिकेतून. भाषा आणि प्रांताच्या बंधनापलिकडे जाऊन प्रेमाचं आपलं एक नवं विश्व तयार करणा-या प्रेमी युगुलाची ही गोष्ट आहे. सोबतच एका वडील आणि मुलीच्या प्रेमळ नात्याचीही ती गोष्ट आहे. येत्या २८ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

काहे दिया परदेसची कथा आहे गौरी आणि शिव यांच्या प्रेमाची. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली गौरी एका मोठ्या कंपनीच्या सेल्स टीम मध्ये नोकरीला आहे. वडील मधुसुदन सावंत हे आकाशवाणी केंद्रात मराठी विभागात नोकरीवर तर आई शिक्षिका आहे. मधुसुदन यांना मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा अभिमान आणि प्रेमही आहे. आपल्या रोजच्या जगण्या वागण्यात त्यांच्या या मराठी प्रेमाचे दाखले ते देतच असतात. परप्रांतियांमुळे येथील भूमीपुत्रांचं होणार नुकसान आणि त्याचा भविष्यावर होणारा परिणाम हा त्यांचा चर्चेसाठीचा आवडीचा विषय. कुठल्याही प्रकारचं स्थलांतर हे मधुसुदनरावांना मान्य नाहीये. गौरीला हे सगळं फारसं रुचत नसलं तरी वडिलांच्या प्रेमापोटी किंवा ते दुखावू नयेत म्हणून तीही त्यांच्याशी या विषयावर फार वाद घालत नाही. घरात मराठीपणाचं आणि मराठी बाण्याचं हे असं वातावरण असताना गौरी एका अमराठी तरूणाच्या म्हणजेच शिवच्या प्रेमात पडते. बनारसवरून मुंबईत नोकरीसाठी आलेल्या शिवचंही गौरीवर तेवढंच प्रेम आहे. शिव भाषा आणि प्रांताच्यापलिकडे माणूसपण जपणारा आहे. मुंबईत आल्यावर इथली संस्कृती आणि भाषेलाही आत्मसात करण्याचा तो प्रयत्न करतोय तरीही मधुसुदन सावंत यांचा या प्रेमाला विरोधच आहे. परंतु गौरीचं शिववर असलेलं प्रेम आणि त्याच्याबद्दलची ओढ यापुढे त्यांचा विरोध मावळतो आणि ते या प्रेमाला आणि लग्नाला मान्यता देतात... पण जेव्हा गौरीला बनारसला तिच्या सासरी पाठवण्याची वेळ येते तेंव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न येतो... काहे दिया परदेस...

काहे दिया परदेस या मालिकेत गौरीच्या प्रमुख भूमिकेत सायली संजीव आणि शिवच्या भूमिकेत ऋषी सक्सेना ही नवीन जोडी दिसणार आहे तर गौरीच्या वडिलांच्या म्हणजेच मधुसुदन सावंतच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी तर आईच्या भूमिकेत प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखले बघायला मिळतील. शिवचं कुटुंब बनारसमधील आहे त्यामुळे या मालिकेचं बरंचसं चित्रीकरणही बनारसमध्ये होणार असून त्याच्या कुटुंबियांच्या व्यक्तिरेखा मालिकेत ख-या उतराव्यात यासाठी कथेची गरज म्हणून हिंदी भाषिक कलाकारांची निवड करण्यात आली आहे. महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता यांच्या टेल अ टेल मीडियाची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे अजय मयेकर यांनी.

--------------------