Sign In New user? Start here.
 
 

“सामाजिक भान आणि संवेदना जपणारा ‘उंच माझा झोका पुरस्कार”

विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्याही पेक्षा एक पाऊल पुढे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या आणि प्रसिद्धीचा सोस न बाळगता अव्याहतपणे आपले कार्य करणा-या किती तरी महिला आपल्या आजुबाजूला आहेत. परंतु त्यांच्या कामाची दखल प्रत्येक वेळी घेतली जातेच असे नाही. अशा कर्तृत्वान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका पुरस्कार’ या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरूवात केली. यंदा या पुरस्काराचं दुसरं वर्ष होतं आणि याही वर्षी राज्यात, देशात आणि जगात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या १४ कर्तृत्वशालिनींचा गौरव करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अनेक मान्यवरांच्या पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेविका सुमनताई बंग यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक भान आणि जाणिवा जपणारा हा पुरस्कार सोहळा येत्या रविवारी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

Zee Marathi's Unch Majha Jhoka Puraskar 2014”

हा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सुमनताई बंग म्हणाल्या की, “स्त्रियांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी झी मराठी वाहिनीने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे महिलांना त्याचे काम करण्यासाठी नवा हुरूप मिळेल. आजच्या काळात स्त्रियांचं सबलीकरण होणं फार गरजेचं आहे. विशेषतः सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि व्यक्तिमत्व विकास याबाबतीत हे सबलीकरण व्हायलाच हवं. राजकीय क्षेत्रात महिला आल्यानंतर सर्व भेदाभेद विसरून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. आज समाजात स्त्रीया सुरक्षित नाहीयेत यासाठी केवळ कायदा किंवा शिक्षेची तरतूद पुरेशी नाही तर त्यासाठी पुरुषांची मानसिकता बदलण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. त्याचा दृष्टिकोण बदलला तर तो स्त्रीला तिच्या कार्यात पाठिंबा आणि प्रोत्साहन देईल त्यामुळे समाजातील परिस्थिती बदलेल”.

Zee Marathi's Unch Majha Jhoka Puraskar 2014”

'उंच माझा झोका पुरस्कार २०१४' सोहळ्यात एकूण चौदा क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुवर्णा रावळ, देवदासी प्रथा विरोधी चळवळीच्या प्रणेत्या साधना झाडबुके, शिक्षण क्षेत्रासाठी रेणू दांडेकर, मेळघाटातील कुपोषितांच्या आरोग्यासाठीचा लढा देणा-या डॉ. स्मिता कोल्हे, भारतातील पहिल्या समुद्रविज्ञान शास्त्रज्ञ महिला डॉ. अदिती पंत, वन्यजीव संरक्षक विद्या अत्रेय, मुकबधिर मुलांच्या विकासासाठी कार्यरत असणा-या कांचन सोनटक्के, आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके, आंतरराष्ट्रीय टेनिसमधील आशिया खंडातील एकमेव महिला पंच शीतल कन्नमवार अय्यर, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी माधवी गांधी, कौटुंबिक हिंसाचाराविरूद्ध लढणा-या अॅड. फ्लेविया अॅग्नेस, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि जलतरणपटू गौरी गाडगीळ यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच दोन हजार झोपडपट्टयांमधील आर्थिक दुर्बल महिलांना भक्कम आधार देणारी अन्नपूर्णा परिवार या संस्थेला उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

Zee Marathi's Unch Majha Jhoka Puraskar 2014”

अतिशय वेगळ्या धाटणीच्या या सोहळ्यात संवेदनशील कवी आणि अभिनेते किशोर कदम, मकरंद अनासपुरे यांनी स्त्रीच्या जगण्यातील संघर्ष मांडणा-या कविताही सादर केल्या तर विविध नृत्यछटांमधून स्त्रीची विविध रूपे दाखवण्यात आली. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे नेटके आणि तितकेच हृद्य निवेदन केले. येत्या २४ ऑगस्टला हा ‘उंच माझा झोका पुरस्कार’ सायंकाळी ७ वा. झी मराठीवर प्रेक्षकांना बघता येईल.

 

-----------