Sign In New user? Start here.

‘मालिकांमध्ये साजरा होणार गुढीपाडव्याचा आनंदोत्सव


मालिकांमध्ये साजरा होणार गुढीपाडव्याचा आनंदोत्सव
LIGHT-HOUSE"
 
 

‘मालिकांमध्ये साजरा होणार गुढीपाडव्याचा आनंदोत्सव

मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते त्या गुढीपाडव्याचा आनंदोत्सव झी मराठीच्या मालिकांमध्येही बघायला मिळणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकांमध्ये आणि ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नववर्षाची गुढी उभारण्यात येणार आहे आणि मालिकेला नवं वळणही मिळणार आहे. हे भाग गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसारीत होणार आहेत.

राणा-अंजली घरी परतणार

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलामधील राणादा आणि अंजलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या दोघांचं नुकतंच लग्न झालं परंतु लग्नानंतर राणाने आपल्या संसाराची सुरुवात शेतातील घरात करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्या या निर्णयामागे वहिनीचं कारस्थान होतं ज्याला राणा बळी पडला होता. राणाने थोरल्या सुनबाईसह घरी परतावं यासाठी राणाचे आबा प्रतापराव आणि गोदाक्का दोघेही विविध प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश येणार असून या राणा आणि अंजली गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहेत.

मालिकेतील या नव्या वळणाबद्दल राणा म्हणतो की, लग्नानंतरचा हा आमचा पहिलाच गुढीपाडवा आहे. आमच्या संसाराची सुरुवातच एका वेगळ्या प्रकारे झाली. आमचं राहतं घर सोडून मी अंजलीबाईंना घेऊन शेतातील घरात संसार सुरु केला होता आणि त्यांनी तिथेही माझी साथ दिली. आम्ही घरी परत यावे ही सर्वांचीच इच्छा होती आणि या गुढीपाडव्याला ती पूर्ण होणार आहे. मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर आम्ही घरी परतणार आहोत. माझ्यासाठी आबांचा आणि गोदाक्काचा आनंद महत्त्वाचा आहे. एकत्र कुटुंबात राहण्याची अंजलीबाईंचीसुद्धा इच्छा होती त्यांची इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. या सगळ्यात कुणीच दुखावणार नाही याचीही काळजी मला घ्यायची आहे आणि त्याचा पूर्ण प्रयत्न मी करणार आहे. या गृहप्रवेशाबद्दल अंजली म्हणते की, लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहणं हे कोणत्याही मुलीचं स्वप्न असतं. आता या गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझंही हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मला घरातील सर्व लोकांची काळजी घ्यायची आहे आणि सर्वांना प्रेम द्यायचं आहे. एक थोरली सून म्हणून सर्वांच्या माझ्याकडून खूप सा-या अपेक्षा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत.

माझ्या नव-याची बायको ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे. शनायाला शह देण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका कसोशीने प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे. कोणताही सण किंवा समारंभ असो तो कुटुंबासमवेत साजरा करणे हा राधिकाचा स्वभाव. जरी शनाया राधिकाच्या हक्काच्या घरात ठाण मांडून बसली असली तरी हा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आपल्याच घरात साजरा करणार असा निर्णय राधिका घेते. गुढीपाडव्याच्या दिवशी छान सजून राधिका घरी पोचते आणि गुरुनाथलाही यासाठी तयार करते. यावेळी नेहमीप्रमाणे शनाया विरोध करते परंतु राधिका तिच्याकडे दुर्लक्ष करत गुरुसोबत ही गुढी उभारते.

चला हवा येऊ द्या मध्ये आमिरची मराठमोळी गुढी

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न बघणा-या आमिर खानने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून या स्वप्नाच्या दृष्टीने एक आश्वासक पाऊल टाकलं आहे. त्याच्या या कामाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि या चळवळीत लोकसहभाग वाढावा यासाठी आमिर आपल्या टीमच्या सदस्यासह चला हवा येऊ द्या मध्ये सहभागी झाला होता. याच कार्यक्रमात आमिरने आपली पत्नी किरण रावसह मराठमोळी गुढीही उभारली. येत्या २७ आणि २८ मार्चला रात्री ९.३० वा. चला हवा येऊ द्या चे हे दोन्ही भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.