Sign In New user? Start here.
zee yuva channel and first serial
झी युवा वाहिनी आणि त्यावरील मालिका यांची पहिली झलक
 
 

झी युवा वाहिनी आणि त्यावरील मालिका यांची पहिली झलक

महाराष्ट्र आतुर आहे २२ ऑगस्टला महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या झी युवा वाहिनी आणि त्यावरील मालिका यांची पहिली झलक बघण्यासाठी. झी युवावरील बन मस्का मालिकेचे शीर्षक गीत डिजीटल माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित झाले असून ह्या शीर्षक गीताला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. अवघ्या काही तासातच तब्बल ५० हजारहून अधिक लोकांनी गाणं पाहिले असून त्यांना हे आवडत देखील आहे. हे शीर्षक गीत महाराष्ट्राचा लाडका जसराज जोशी आणि बन मस्का या गाण्याद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सोनिया मुंढे यांनी गायले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवलेले महेश लिमये यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले आहे. हे गाणं बन मस्कामधील शिवानी रांगोळे आणि शिवराज वैचल जे या मालिकेमध्ये मैत्रेयी आणि सौमित्र यांची भूमिका साकारणार आहेत यांच्यावर चित्रित आहे.

गाण्याचे शब्द, संगीतरचना, छायाचित्रण, दिग्दर्शन सगळ्यामध्येच नाविन्यता आहे. याआधी मराठी मालिकांचे शीर्षक गीत अश्याप्रकारे कधीच चित्रित केले नाही असं म्हणायला हरकत नाही. मराठी प्रेक्षकांनी जे याआधी कधीही पाहिले नाही अशी कथासूत्र, कार्यक्रम झी युवा प्रेक्षकांसाठी घेऊन येईल हे या शीर्षक गीताने सिद्ध केले आहे. या गाण्याद्वारे प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नाविन्यपूर्ण बघायला मिळणार आहे यात वाद नाही.

शब्दांमध्ये असलेला खुशखुशीत आणि ताजेपणा हा या गाण्यामध्ये वापरलेला एक फाडू नुस्खा आहे. तसेच गाण्यातला चकचकित आणि नवेपणा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. नात्यामध्ये दाखवलेला गोडवा अगदी नाविन्यपूर्ण आहे. सोनियाचा मधुर आवाज आणि त्यात घेतलेल्या खोडकर हरकती, जसराजच्या आवाजामधून आलेला फ्रेशनेस प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

यावर बोलताना, जसराज म्हणाले, झी युवाच्या बन मस्का या मालिकेच गाणं, त्यातले बोल आणि त्याची संगीत रचना देखील खूप फ्रेश आहे आणि नवीन आहे. आजच्या तरुण पिढीशी खूप साधर्म्य साधणार आहे हे गाणं आहे. आम्ही जी मस्ती, मज्जा गाणं गाताना करतो तीच तुम्हाला या गाण्यामध्ये अनुभवायला मिळेल याची मला खात्री आहे. झी युवा आणि आमच्या गाण्याला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. काहीच तासातच ५० हजारहुन अधिक लोकांनी हे गाणं फेसबुक वर पाहिलं आहे त्यांना हे गाणं आवडत देखील आहे यातच आम्ही सगळे खूप खुश आहोत.

--------------------