Sign In New user? Start here.

elected bmm president and comity

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

बीएमएमचे १५ वे अधिवेशन जल्लोषात संपन्न

   बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १५ वे अधिवेशन नुकतेच या मंडळाच्या जन्मभूमीत म्हणजेच शिकागो शहरात मोठ्या दिमाखात पार पडले. बीएमएमच्या जन्मभूमीत हे अधिवेशन दुस-यांदा पार पडले. त्यामुळे हे अधिवेशन सर्वांसाठीच आनंदाचे क्षण घेऊन आलं होतं. सलग तीन दिवस भारतातून आणि उत्तर अमेरिकेतून सादर करण्यात आलेल्या अनेक दर्जेदार कार्यक्रमांचा प्रेक्षकांनी अतिशय मनमुराद आनंद लुटला आणि आस्वादही घेतला. कार्यक्रमांच्या विविधतेमुळे आणि अधिवेशनाच्या उत्तम आयोजन आणि संयोजनामुळे शिकागोतील अधिवेशन प्रत्येक प्रेक्षकाच्या चांगलेच लक्षात राहील असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

   पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलनाने बृहन महाराष्ट्र मंडळाच्या १५ व्या अधिवेशनाचे उदघाटन ऎरी क्राऊन थिएटरमध्ये संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी, शिकागोच्या भारतीय दूतावासातील उच्च अधिकारी मुक्ता तोमर, ओहिवा प्रांताच्या सिनेटर स्वाती दांडेकर, सुप्रसिध्द मराठी उद्योजक श्री. दत्तात्रय म्हैसकर, सिंबायोसिस कार्यकारी संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, बीएमएमचे शिकागो अधिवेशनाचे संयोजक श्री. नितीन जोशी, अध्यक्षा सौ. माधुरी जोशी, शिकागो महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद पानट यांच्यासह एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारत, अमेरिका आणि कॅनडाचे राष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर उदघाटनपर भाषणात डॉक्टर अनिल काकोडकर यांनी भारतातील सामाजिक समस्यांवर प्रकाश झोत टाकतानाच अणु उर्जेचा वापर हाच भारताच्या महासत्तेकडील वाटचालीचा राजमार्ग असून भारताबाबत अणु उर्जेचे मह्त्व त्यांनी यावेळी ठासून मांडले.

   यावेळी अधिवेशनाचे संयोजक श्री. नितीन जोशी यांचे भाषण अत्यंत हृदयस्पर्शी व त्यांच्यातील अथांग उर्जेचा परिचय करून देणारे ठरले. तर बीएमएमच्या तत्कालीन अध्यक्षा सौ. माधुरी जोशी यांनी बीएमएम च्या संयोजानामागील वैचारिक भूमिका त्यांनी नेमकेपणाने मांडली. तसेच शिकागोच्या भारतीय दूतावासातील उच्च अधिकारी मुक्ता तोमर आणि ओहिवा प्रांताच्या सिनेटर स्वाती दांडेकर यांची भाषणेही यावेळी झाली.

   मान्यवरांच्या भाषणानंतर अनुपमा धारकर यांनी दिग्दर्शित केलेला महाराष्ट्रातून येऊन अमेरिकेत स्थाईक झालेल्या मराठी माणसाचा जीवन प्रवास उत्तम नृत्य संगीतातून प्रतिबिंबित करण्यात आलेला ‘द जर्नी’ हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. त्यात रेवती ओक यांचे अत्यंत सुंदर शैलीदार सूत्र संचालन हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले. यावेळी उपस्थित हजारो मराठी कला रसिकांनी उदघाटन सोहळ्यातील या कार्यक्रमाला अक्षरशः डोक्यावर घेतले.

   त्यानंतर दिवंगत अभिनेत्री स्व. स्मिता पाटील यांच्यावर आधारित "मूर्तिमंत अस्मिता" या कार्यक्रमाने रसिकांच्या हृदयाला चांगलेच रिझवले. तसेच लहान मुलांसाठी झालेल्या खास व्यंगचित्र कार्यशाळा तसेच आर्ट ऑफ लिविंग या कार्यशाळेत जवळपास १५० लहानग्यांनी सहभाग नोंदविला होता. भारतातील कार्यक्रमांबरोबरच उत्तर अमेरिकेतील कार्यक्रमांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

   उभ्या उभ्या विनोद, धूम धडाका, अमेरिकेतील लेखकांचा मेळावा तसेच अमेरिकेतील मराठी कवींचे काव्यवाचन, स्वरांगण गायन स्पर्धा असे एकापेक्षा एक उत्तम संकल्पना राबविलेल्या अनुभवास आल्या. दुस-या दिवशी झालेल्या दिवसभरातील कार्यक्रमांमध्ये पु. लं. देशपांडे यांच्यावर आधारित "मी आणि माझा गोतावळा" हा अतुल परचुरेचा खास कार्यक्रम, अशोक हांडे संयोजित मराठी बाणा, शोभा डे यांचा "नऊवारी ते अरमानी" कार्यक्रम, सुप्रसिध्द मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी चंदेरी गप्पा या आणि अशा अनेक कार्यक्रमांनाही उपस्थितांनी चांगलेच डोक्यावर घेतले. वेगवेगळ्या कार्यक्रमांबरोबरच या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य ठरलं ते महाराष्ट्रीयन भोजन. प्रेक्षकांनी यावेळी अनेक महाराष्ट्रीयन पदार्थांचा चांगलाच आस्वाद घेतला. या अधिवेशनाचा सांगता समारंभही अतिशय वेगळा करण्यात आला. या काही विनोदी कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यालाही प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

   दर दोन वर्षांनी या अधिवेशनरूपी वटवृक्षाखाली येण्याची इथले मराठी नागरिक अतिशय आतुरतेने वाट पाहतात. मनोरंजनाबरोबरच मित्र परिवारांना भेटणे, आनंद साजरा करणे हाही या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक दोन वर्षांनी भरविल्या जाणा-या अधिवेशनाची सांगता झाल्यावर परत पुढील अधिवेशनाची आतुरता उत्तर अमेरिकेतील लोकांच्या नजरेत स्पष्ट पहायला मिळते.

   एकंदर काय तर भारताबाहेर असणा-या उत्तर अमेरिकेतील मराठी लोकांना एका छ्त्राखाली आणणारं बृहन महाराष्ट्र मंडळाचं १५ वं अधिवेशन मोठ्या थाटात पार पडलं. सर्वच वर्गाच्या प्रेक्षकांना विविध सुंदर कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेता आला. शिकागो अधिवेशनातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तम या अधिवेशनाचं संयोजन जे पुढील अनेक पिढ्यांच्या कायम स्मरणात राहील असं म्हटल्यास वावगं ठरु नये!