Sign In New user? Start here.
शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी, अमेरिकेतील राले शहरात, मराठी माणसाच्या हृदयाचे स्पंदन "गर्जा महाराष्ट्र माझा...

garja maharashtra

'गर्जा महाराष्ट्र माझा'

'गर्जा महाराष्ट्र माझा'- तौर्य प्रस्तुती
RTP महाराष्ट्र मंडळ - १३ नोव्हेंबर २०१०

Location

Garner Auditorium, North carolina, USA

view slideshow

सौ. रमा मांजरेकर यांच्या तौर्य संस्थेला, मा. खासदार एकनाथ ठाकूर यांचे उत्स्फूर्त १०,००० डॉलर्सचे पारितोषिक.

   शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी, अमेरिकेतील राले शहरात, मराठी माणसाच्या हृदयाचे स्पंदन "गर्जा महाराष्ट्र माझा" प्रत्यक्ष साकार झाले. तौर्य ह्या संस्थेने महाराष्ट्र राज्याच्या ५० व्या वर्धापन दिना निमित्त RTP महाराष्ट्र मंडळासाठी तब्बल ६५ कलाकाराच्या चमुसाहित, सौ रमा आणि श्री माधव मांजरेकर यांनी महाराष्ट्राचा इतिहास संगीत, नाट्य आणि नृत्य यांच्या सुरेख मिलाप वापरून रेखाटला. ह्या प्रसंगी शिवसेनेचे मा. खासदार श्री एकनाथ ठाकूर आणि अमेरिकेतील सुप्रसिध्द लेखिका आणि दिग्दर्शिका डॉ. मीना नेरुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

   संह्याद्रीच्या कुशीत असो किंवा साता समुद्रापलीकडे, मराठी माणूस आपले स्वत्व, शिवछत्रपतींनी जागवलेला स्वाभिमान, थोर संतांनी केलेले संस्कार आणि दांडकाराण्या पासून "महा" राष्ट्र निर्मिताना घडलेली अस्सल मराठी संस्कृती कधीच विसरू शकत नाही. किंबहुना त्याच्या अस्तित्वाचा तो एक अविभाज्य घटक आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी जनांची महाराष्ट्राशी असलेली भावनिक जवळीक ह्या प्रसंगी खच्चून भरलेल्या सभागृहाला हलवून गेली. कोकणातील गार्हाणं घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रभू रामचंद्रांच्या तेरा वर्षांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पंचवटीपासून सुरु झालेला प्रवास, शिवछत्रपतीचां राज्याभिषेक, मावळचा मर्द मराठा, पेशवाई इश्क दाखवत मुंबईचे कोळी, ठाणे जिल्ह्यातील ठाकर, कोल्हापुरी लावणी, वर्हाडी साज, रत्नागिरीचे अंतू बर्वे आणि मुंबईचा बाल्यांचा गोविंदा करून पूर्ण झाला. ह्या प्रवासात सुरावटांनी सुरेख साथ दिली. गायक, गायिका आणि वाद्यवृंद यांनी अभंग, नाट्यसंगीत, मंगळागौर पासून कोळी गीतांपर्यंत विविध गाणी तितक्याच ताकदीने पेश केली.

   अमेरिकेतील रसिक प्रेक्षक अजूनही 'सुंदरा मना मध्ये भरली" विसरला नाही. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त आग्रहाला मान देऊन डॉ. नेरूरकरांनी पिंजरा चित्रपटातील एक बैठी लावणी सदर करून अभिनय कौशल्याची एक चुणूक दिली. शिट्या- टाळ्यांच्या गजरात सभागृहानेही त्यांना मनापासून दाद दिली. मा. खासदार ठाकुरजींनी शाबासकीची पाठ थोपटताना कार्यक्रमाची तुलना शिवाजी पार्क वरील दोन लाखांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सोहळ्याशी केली. असा जाज्वल्य कार्यक्रम ठिकठिकाणी सादर करता यावा म्हणून उत्स्फूर्तपणे दिलदार अशी दहा हजार डॉलर्सची बक्षिसी जाहीर केली. डॉ. मीना नेरूरकरांनी प्रा. विद्याधर कुलकर्ण्यांच्या तालीमीत कसलेल्या वाद्यावृन्दाचे आणि संगीत, नृत्य आणि अभिनयाचा सुरेख ताळमेळ साधण्याचे खूप कौतुक केले.