Sign In New user? Start here.

mifta awards in dubai

Mifta Awards In Dubai

Mifta Cricket Match Photo Gallery
Mifta Award Night Photo Gallery
launch New web site "Bobilfryday" for Hindi Marathi Movie

 

संतोष भिंगार्डे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दुबईतील पलाडियम ऑडिटोरियम येथे रंगलेल्या मिफ्टा (मराठी इंटरनॅशनल फिल्म ऍण्ड थिएटर अवॉर्ड) पुरस्कार सोहळ्यात "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट; तर याच चित्रपटासाठी संतोष मांजरेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिफ्टा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार "झिंग चिक झिंग' या चित्रपटासाठी भरत जाधव आणि "मी शिवाजीराजे...'साठी सचिन खेडेकर यांना विभागून देण्यात आला; तर "मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटासाठी मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.

"अश्‍वमी फिल्म' आणि "राजा-राणी ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईतील पलाडियम ऑडिटोरियममध्ये रंगतदार वातावरणात पार पडलेल्या मिफ्टा सोहळ्यात दुबईतल्या मराठी माणसांसह तेथील अरबी समुदायही रंगला होता. सोहळ्याला मराठी दुबईकर रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. एकापाठोपाठ एक दिले जाणारे पुरस्कार आणि त्यासोबत असलेल्या धम्माल मनोरंजनात रसिक न्हाऊन निघाले.

बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावल्याने सोहळ्याला चार चांद लागले होते. त्यांनी मराठी भाषा आणि कलावंताचे अभिनंदन केले आणि यापुढेही असाच प्रकारे मराठी पताका जगभरात दिमाखात फडकत राहू दे, अशा शुभेच्छाही दिल्या. त्यांनी बनविलेल्या "विहीर' या चित्रपटासाठी दोन पुरस्कार देण्यात आले. अँथोनी रुबीन आणि प्रमोद थॉमस यांना "विहीर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचा; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळविणारा चित्रपट म्हणून "विहीर'चा सन्मान करण्यात आला.

संगीत विभागात "नटरंग'ने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट गायक म्हणून "खेळ मांडला...' या गाण्यासाठी; तर सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून "वाजले की बारा...' या गाण्यासाठी अनुक्रमे अजय गोगावले आणि बेला शेंडे यांना पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही याच चित्रपटाने पटकाविला. सर्वोत्कृष्ट गीतांचा पुरस्कार "जोगवा' चित्रपटासाठी संजय पाटील यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट खलनायक समीर धर्माधिकारी (लालबाग-परळ), सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार स्वप्नील जोशी (मुंबई-पुणे-मुंबई), सर्वोत्कृष्ट कथा जयंत पवार (लालबाग-परळ), पटकथा परेश मोकाशी (हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी) आणि संवादाचा पुरस्कार संजय पवार व महेश मांजरेकर यांना विभागून देण्यात आला.

चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर, पुष्कर श्रोत्री, गिरीजा ओक या कलाकारांनी खुमासदार शैलीत सोहळ्यात निवेदन केले. मकरंद अनासपुरे, वैभव मांगले, कमलाकर सातपुते, विकास समुद्रे, प्रदीप पटवर्धन, विजय कदम या कलाकारांनी विनोदाची आतषबाजी केली. दीपाली सय्यद, रेशम टिपणीस, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, उमेश जाधव, अनिकेत विश्‍वासराव, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी विविध गाण्यांवर धमाल नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्याला दुबईकरांनी "वन्स मोअर'ची साथ लाभली. कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर या लिटिल चॅम्प्सनीदेखील या सोहळ्याची उत्कंठा वाढविली. अजित परब आणि पद्यजा फेणाणी-जोगळेकर यांच्याबरोबरच स्वप्नील बांदोडकरच्या "राधा ही बावरी'ने उपस्थितांना वेड लावले. महेश मांजरेकर आणि अभिजित पाटील यांनी हा सोहळा आयोजित करण्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिरीष पारकर यांनी मराठीचा झेंडा सगळीकडे फडकला पाहिजे, असे सांगितले. सोहळ्यादरम्यान प्रकाश आणि मंदा आमटे यांना "गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

अमिताभने मानले महाराष्ट्राचे आभार

 

महाराष्ट्रामुळे आपणास नावलौकिक प्राप्त झाला म्हणून आपण मराठी चित्रपटाची निर्मिती केली. मराठी चित्रपटसृष्टी एक पाऊल आणखी पुढे टाकीत आहे, याचा आपणास आनंद आहे. कलेला प्रोत्साहन देणे हे आपले काम आहे आणि आपण ते नेहमीच केले आहे. भाषा आणि आपली कला देश-विदेशात जात आहे, याचा आनंद आहे, असे अमिताभ बच्चन म्हणाले. तसेच या वेळी त्यांनी मराठी कलाकारांचा गौरवही केला.

कलाकारांचा क्रिकेट सामना

कलाकार आणि तेथील महाराष्ट्र मंडळाचे सदस्य यांच्यामध्ये एक क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. दुबईच्या भव्य स्टेडियमवर शुक्रवारी (ता. 18) झालेल्या या सामन्यात बाजी मारली ती महेश मांजरेकर यांच्या संघाने. त्यांनी दुबई येथील महाराष्ट्र मंडळ संघाचा पराभव केला.

 

src=