Sign In New user? Start here.

 

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

चित्रपट निर्मितीचा छंद जोपासणारा सॉफ्टवेअर इंजिनीअर

  पोटापाण्याची नोकरी, व्यवसाय सांभाळून, उत्तमरित्या एखादा छंद जोपासणारे, त्यात नैपुण्य मिळवण्याची धडपड करणारे काही जण आपल्या अवती भवती अनेकदा आढळतात. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, साहित्यिक, कै.पु.ल. देशपांडे हे एकदा म्हणाला होते - "उपजीविकेसाठी आवश्यक असणारं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य़, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्यातरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल." ह्या मताला जणुं दुजोरा देणारी, एक कलासक्त व्यक्त आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असून साहित्य, कला, चित्रपट असे छंद जोपासणारा सत्यजित खारकर !

   सत्यजितचं मूळ गांव मराठवाड्यातील औरंगाबाद ! त्याचं शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षणही औरंगाबाद येथे झालं. त्याकाळी(१९८०-९० च्या दरम्यान काही नाट्कात त्याने भूमिका केल्या. महाविद्यालयीन काळात ‘चल संधी साधू’ हे त्याचं लिहिलेलं नाटक कॉलेजमध्ये चांगल्या अर्थाने गाजलं. आकाशवाणी औरंगाबाद -रेडिओ’ वर काही नभोनाट्यात त्याने लिहिलेली नभोनाट्यही आकाशवाणी औरंगाबाद - रेडिओवर प्रसारित झाली. इंजिनीअरींगची पदवी मिळवून काही वर्षे त्याने भारतात नोकरी केली. पुढे, ‘आय टी’, मध्ये शिक्षण घेतले आणि नोकरीनिमित्त सत्यजित व त्याची पत्नी अपर्णा सुमारे दहा वर्षापूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले.

   अमेरिकेत नोकरी करत असतांना एकीकडे साहित्य, नाटक, चित्रपट, याविषयीची आवड सत्यजितला स्वस्थ बसू देईना. महाराष्ट्र मंडळ शिकागोतील कार्यक्रमात सत्यजितचा सहभाग असतोच. पण मराठीपलिकडे जाऊन इंग्रजी नाटकातही त्याने भूमिका केली. त्याबद्दल एक आठवण सांगतो - "शिकागोमधे एका इंग्रजी नाटकासाठी ओपन ऑडिशनचं आमंत्रण होतं. मी ऑडीशन साठी तेथे हजर झालो. चाचणीत मी उत्तमरित्या उत्तीर्णही झालो. 'The Intelligent Design of Jenny Chow' हे नाटक! वास्तविक, मूळ नाटकात त्यांना हवं होतं, एका रशियन डॉक्टर/शास्त्रज्ञाचा रोल करणारे पात्र! पण माझी निवड झाल्यावर, नाट्य्दिग्दर्शिकेने रशियन डॉक्टरऎवजी भारतीय डॉक्टरची भूमिका- असा नाटकामधे बदल करून मला त्या भूमिकेसाठी काम दिलं. त्या नाटकाचे शिकागोत बरेच प्रयोग झाले आणि सगळे हाऊसफुल्ल ! त्या नाटकात काम केल्यावर अजूनही काही इंग्रजी नाटकात मी काम केलं. आणि माझ्यात आत्मविश्वास आला. मराठीभाषक कार्यक्रमांव्यतिरिक्त, अमेरिकेत, सथानिक लोकांमद्ये, इंग्रजी भाषेतही आपण काही कलाकॄती सादर करू शकू ह्याची जाणीव झाली."

   त्यानंतर मग सत्यजितने शिकागोतील एक ज्येष्ठ अभिनेत्री व नाट्यदिग्दर्शक - मॅडेलिन फ्रॅंकलिन यांच्याकडे अभिनयाचे धडे मिळण्याच्या दॄष्टीने एक कोर्स केला. मॅडेलिन फ्रॅंकलिन दिग्दर्शित, एल्जिन थिएटर कंपनी निर्मित, ’M A S H' ह्या विनोदी नाट्कासाठी फ्रॅंकलिनचा सहाय्यक म्हणून सत्यजितने काम केलं. त्यापैकी बरचसं काम स्वयंसेवी असतं तरी, सत्यजितच्या मते, त्यातून खूप काही शिकायला मिळालं. आणि त्यानंतर चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, समाजप्रबोधन माहितीपट, चित्रपट काढण्याचे विचार त्याच्या मनांत घोळू लागले. स्वयंशिक्षक पद्धतीने, माहिती मिळवत, मग सत्यजित खारकर आणि त्याचा धाकटा भाऊ राहूल गांधी यांनी २०११ साली ‘अनमोल मूव्हीज’ ही संस्था काढली.

   एकीकडे नोकरी सांभाळून, गेल्या चार वर्षात सत्यजितने इंग्रजी, मराठी भाषेतील काही लघुपट, माहितीपट, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यातील काही असे -

   बॄह्नमहाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथे(२०११) झालेल्या १५ व्या अधिवेशनाच्या निमित्ताने, अधिवेशनाच्या एक वर्ष अगोदर, शिकागोपरिसर आणि शिकागो मराठी मंडळ संबधित एक उत्कॄष्ठ माहितीपट सत्यजितने बनवला.

   * लघुपट - सत्यजित दिग्दर्शित, पहिला पुरस्कारप्राप्त चित्रपट आहे. 'My Dad My Hero', ज्यामुळे, त्याला अजून पुढे चित्रपट निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. हा लघुपट पहाण्यासाठी संकेतस्थळ -

   * माहितीपट - कार ड्राईव्हिंग करतांना सेल फोनवर एकीकडे टेक्टिंग करण्याच्या आत्मघातकी सवयीच्या विरोधात, संदेश देणारा सत्यजित खारकर दिग्दर्शित अनमोल मूव्हीजने बनविलेला इंग्रजी लघुपट आहे DWT. अमेरिकेतील एका शहरात, हॅलोवीनच्या संद्याकाळी कॉश्च्यूम पार्टीसाठी काही मित्र कारने जात असतात. त्यांना माहीत नसते की कुणी अज्ञात त्यांच्यावर नजर ठेऊन आहे आणि एका विशिष्ट घटनेने त्यांचे सर्व आयुष्यच बदलून जाते. DWT लघुपट.

   * लघुपट - शिकागोच्या अनमोल मूव्हीज निर्मित आणि सत्यजित खारकर दिग्दर्शित खास इंटरनेटसाठी बनविलेला लघुपट आहे "..आणि जगण्याचा अर्थ गवसल". ओंकार वैद्य या तरूण आणि प्रतिभावान कवीस त्याच्या सॄजनशील लिखाणाबद्दल २००५ साली राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय बालश्री’ हा पुरस्कार मिळाला. ओंकारने आपल्या गंभीर अपंगत्वावर मात करून हा पुरस्कार मिळवला हे विशेष. या भावपूर्ण लघुपटामधे सत्यजित खारकर यांनी ओंकारच्या काही कविता आणि त्याच्या आईवडीलांनी अनुभवलेला त्याचा जीवनप्रवास सुरेख टिपला आहे. या लघुपटाला इंग्रजी सबटायटल्सची सोय उपलब्ध आहे. प्रत्येकाने आवर्जून बघावा असा हा लघुपट पाहण्यासाठी संकेतस्थळ -

   * फिचरफिल्म - सत्यजितने दिग्दर्शित केलेली 'Coin Toss' ही पुरस्कारप्राप्त इंग्रजी पिचरफिल्म देखील उल्लेखनीय आहे. ‘एका नाणेफेकीत भाग्य बदलू शकतं, सोबतीला एका चोरीचा मामला - गुंतवणूकीचा फॉर्म्यूला, षडयंत्रकारी जुळे भाऊ, एक अब्जाधीश, डबल क्रॉस करणारी प्रेयसी, ३५ कोटी डॉलर्स लॉटरीचे तिकिट आणि स्वत:ची पात्रता सिद्ध करायला लावणा-या अनंत घडामोडी...टॉम बेनेटचं जीवन ढवळून टाकतात आणि त्याला कळून चुकतं, आयुष्यात हारजीत, दोन्हीही महत्वाचं !’ असं ह्या पिचरफिल्मचं संक्षिप्त विवेचन.

   स्वतंत्रपणे निर्मित 'Coin Toss' ह्या इंग्रजी फिचर फिल्मला अमेरिकेत प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आजे. हा चित्रपटाला अमेरिकेतील Route 66 - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ऑडियन्स फेवरीट डिबट फिल्म अवार्ड’ मिळालंय. amazon.com वर 'Coin Toss' चित्रपटासंबधित अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - www.cointossmovie.com

   ‘आयुष्य क्षणभंगूर असतं. तेव्हा न आवडणा-या गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा काही ध्येय बाळगून आणि ज्यात मन रमतं, अशा चांगल्या गोष्टीत काहीतरी विधायक करावे’ असं सत्यजितचं मत आहे. त्याच्या आगामी फिचरफिल्मची कल्पना आकारास येत आहे. शिकागोमधील एका इंडोअमेरिकन विवाहाचा विषय आणि त्यातून काही बोध, असा विषय त्यात हाताळला आहे.

   सिनेमा/मुव्हीज पहाण्यामागच्या फिलॉसॉफी बद्दल कुणीसं म्हटलं आहे - 'Most of the audience members want to go to the cinema/Movie, to be moved' आर्थिक आणि व्यावसायिक यशापलिकडे जाऊन विचार केल्यास, बहुतेकांची चित्रपटाकडून एक अपेक्षा असते - ‘आयुष्याची, माणसामाणसातील गुणदोषांची, त्याच्या परिणामांची सांघिक अनुभूती घेत, आंतरिक व भावनात्मक बॅन्ड विड्थ प्रगल्भ करणे.’ सत्यजितच्या चित्रपट-निर्मित व दिग्दर्शनाच्या छंदामागे हीच उर्मी दिसून येते.

   सत्यजित खारकरला, त्याच्या आगामी चित्रपट-प्रकल्पांसाठी शुभेच्छा !

   विनता कुलकर्णी