Sign In New user? Start here.

कॄष्णा पाटील

Krushna Patil interview

 

स्वत:तीला आत्मविश्वास आपल्याला पुढे नेतो -

कॄष्णा पाटील(गिर्यारोहक)

पुण्यातील अवघ्या वीस वर्षांची गिर्यारोहक कृष्णा पाटील हिने अंटार्टीकातील विल्सन मॉसिस हे सर्वोच्च शिखर सर केले. अवघ्या महाराष्ट्राची शान या गिरीकन्येने उंचावली. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्र कन्या कृष्णा पाटील हीने केलेलं धैर्य हे काही छोटं नव्हतं. ह्या कर्तुत्ववान महिलेबद्दल जाणून घेण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झगमग डॉट नेट ने कॄष्णाची घेतलेली ही खास मुलाखत.....

* तुला एव्हरेस्ट शिखर सर करण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली?

- २००७ पासुन मी नेहरु इन्स्टीट्युट मध्ये माऊन्टन क्लाईम्बींग चे बेसीक कोर्स केले. मग २००८ मध्ये अ‍ॅड्व्हान्स कोर्स केला. कोर्स करताना एव्हरेस्ट शिखर सर करणार असा कधी विचार केला नव्हता. लहाणपणापासुन माऊन्टन क्लाईम्बींग मध्ये पर्वत चढायचं एवढं नक्की होतं. इन्डीयन हिमालयामध्ये शिवलींग, भगीरती, गंगोत्री, केदारनाथ, भद्रीनाथ हे पर्वत जे आहेत फार इन्ट्रेस्टींग आहेत. जास्त उंच नसले तरी, त्यातला काही भाग फार अवघड आहे चढायला. २००८ ला मी एन. आय. एम. च्या मोफत प्रयोगाला गेले. त्यात मी माऊंन्ट संतोपन्त या शिखरावर जाणार होते. संतोपन्त सर केल्यावर मी जगातील सर्वात महान मुलगी झाले. संतोपन्त चढायला आठ हजार पंच्याहत्तर (८०७५) मिटर उंच आणि ही टीम एव्हरेस्ट टीम होती. संतोपन्त सर करणे हा एक प्रयत्न होता. त्यांनी मला एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रोस्ताहीत केले. पण मी एव्हरेस्ट स्वतंत्रपणे चढले. एशियन ट्रेकींगची इको एक्स्पीडीशन(मोहीम) मध्ये २००९ ला सहभागी झाले. आम्ही आठ जण होतो. त्यात मी एकटीच मुलगी होती. सगळ्यात लहान होते आणि त्यातही भारतीय होते. याचा मला फार अभिमान होता. बाकी पाच जण अमेरीकेची होती. एक जर्मनीचा आणि एक डच(नॉर्व्हे) चा होता. आम्ही आठ पैकी चार जणांनी यशस्वीरीत्या एव्हरेस्ट सर केलं. त्याठिकाणी पोहचल्यावर मी अनुभवलं की, निसर्गाचं हे सौंदर्यं एका क्षणासाठी मला भूल देऊन गेलं.

* तुला अडचणी अनेक आल्या असतील आणि तू त्या अडचणींना कशा रीतीने सामोरी गेलीस?

- सगळ्यात मोठी अडचण पैशांची होती. कारण, एव्हरेस्ट ही २५ लाखाची एक्स्पीडीशन(मोहीम) असते. तर पैसे गोळा करणं मला फार अवघड जात होतं. सारस्वत बॅकेकडून लोन घेऊन एव्हरेस्ट चढले मी. नंतर एव्हरेस्ट सर केल्यावर सारस्वत बॅकेने नफ्यासह तीस लाखाचे लोन माफ केले. ती पुण्याची सारस्वत बॅकेची शाखा होती. त्यावेळी बॅकेचे व्यवस्थापक म्हणून कुंकवळीकर होत्या. तर बॅकेचे मुख्य व्यवस्थापक ठाकूर हे होते.

* एव्हरेस्ट शिखर सर करताना गिर्यारोहणाचे काही अलिखित नियम आहेत, ते कोण-कोणते आहेत? याबद्दल सांग?

- मार्च मध्ये मी एन.आय.एम. चा कोर्स केला. माऊन्टन क्लाईम्बींग साठी ऑलंम्पिक प्रमाणे काही वेगळी तयारी करावी लागत नाही. माऊन्टन क्लाईम्बींग मध्ये सर्व तयारी मला स्वत:ला करावी लागली. संतोपन्त हीच माझी एव्हरेस्ट साठीची तयारी होती. संतोपन्तसाठी आम्ही २३ तास सलग ऑक्सिजन शिवाय चाललो होतो. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. शिखर सर करणे ऐच्छिक असते, सुखरूप घरी परत येणे अनिवार्य असते, हा गिर्यारोहणाचा अलिखित नियम आहे. एव्हरेस्ट सर होईल की नाही, असा प्रश्‍न कदापि मनात येऊ देऊ नका. गिर्यारोहणाचा आनंद लुटा आणि फक्‍त पुढील पावलाचा विचार करा,''.

* तुझे आदर्श व्यक्तीमत्व कोण आहे?

- माझा जीवनात आदर्श व्यक्तीमत्व म्हणून इंदिरा गांधी यांचं स्थान आहे. मी त्यांच्या आत्मचरीत्राचे वाचन केले आहे. आजवर त्यांनी आपल्या जीवनात बरीच कष्ट घेतली आहेत. त्या लहान असताना त्यांनी आजाराने ग्रासलेल्या आईला सांभाळत शिक्षण पुर्ण केलं. त्यानी त्यांच्यां आयुष्यात आलेल्या अडचणींना कशा पध्दतीने तोंड दिलं हे खरचं शिकण्यासारखं आहे. त्यांचे जीवन चरीत्र व जीवन जगण्याची पद्घत मला फार आवडते. कैथरीन फ्रैंक यांनी लिहिलेले ‘द लाईफ ऑफ इंदिरा नेहरु गांधी’ हे पुस्तक सर्वात जास्त आवडले आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी केलेले कार्य महिलांसाठी प्रेरक कार्य आहे, असे मला वाटते.

* या व्यतिरीक्त तुला काय करायला आवडते? तुझे इतर छंद काय आहे?

- या व्यतिरीक्त मला इन्टेरीअर डिझायनिंग हे क्षेत्र फार आवडतं. डान्स व कोरीऒग्राफी ही करण्याचा माझा छंद आहे. मी त्याचे कोर्सेसही केलेत. मानसशास्त्र विषयात पदवीत्तर शिक्षण घेण्याची इच्छा आहे. सध्या मी (मुंबईत) राज्यशास्त्र विषयात पदवीत्तर शिक्षण घेत आहे. या सोबतच मला विविध नव्या जातीची कुत्री पाळण्याची ही आवड आहे.

* तुझी स्वप्न काय आहेत?

- मला भारतातील अशी १३ पर्वत सर करण्याचा मानस आहे. जे की ८००० मीटर उंची पेक्षा जास्त आहेत. त्या मोहीमेसाठी मी पुढील वर्षापासुन सुरुवात करणार आहे. मात्र हे सर्व करण्यासाठी आवश्यक आर्थीक मदत मला मिळत नसून मी त्याच्या प्रयत्नात आहे. मी एवढ्या प्रमाणात आर्थीक मदत मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना माझ्या आई-वडिलांनी मला फार मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे. या शिखर मोहीमेसाठी मला आवश्यक असलेली आर्थीक मदत लक्षात घेता यावर बराच विरोध झाला. एवढ्या पैशात तर मुलींचं लग्न झालं असतं. मुलींचं मेडीकल मधील शिक्षण पूर्ण केलं असतं अशा स्वरुपात विरोधही लोकांकडून केला गेला. पण माझ्या आई- वडिलांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला व मी तो विश्वास खरा करुन दाखवला. आजही माझ्या पुढील ध्येयाबद्दल माझे आई - वडील संपुर्ण सहाय्य करतात.

* आजच्या युवतींबद्दल तुझी काय भावना आहे?

- त्यांना मी एवढंच सांगू इच्छीते की, त्यांनी आपल्या विचाराची दारे उघडी करुन जीवन जगणं गरजेचं आहे. आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. ब-याच ठिकाणी आई-वडिल आपल्या मुलींना सॉफ्ट-टॉईज सारखे पाळतात. हे चूकीचे आहे. मुलींना हव्या त्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली पाहिजे. विचार संकुचीत न ठेवता जगणे महत्वाचे आहे, असं मला वाटतं.

स्नेहा मुथा