Sign In New user? Start here.

क्षितिजा आवारे-दानवे

 
हे स्त्रीत्व अजून जगायला आवडेल....! -

Kshitija Aware-Danve
Android Developer
Sateri Software Services Pvt. Ltd

आजची स्त्री, २१ व्या शतकातील सशक्त व्यक्तीमत्व. स्वत:च्या सर्व कल्पना अस्तित्वात आणणारी, आयुष्याची वाट बदलणारे, आणि अगदी आकाशालाही गवसणी घालायला उत्सुक असे स्वतंत्र व्यक्तीमत्व. तसेच मह्त्वकांक्षा पूर्ण करूनही घराचा किल्ला राखणारी यशस्वी किल्लेदार आहे आजची स्त्री. सध्याच्या जगाचा झपाट्याने बदलणारा पैलू म्हणजे आजची ‘स्त्री’. परमेश्वराने स्त्रीला घडवतांना विशेष गुणवत्ता दिल्या आहेत. तिने या बलस्थांनाचा वापर केला. तर ‘Nothing is impossible'.

माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटूंबातला. पण मुलगी असली तरी माझ्याबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे. कुठलंही करिअर करण्याची मुभा होती. करिअरच्या मार्गात स्त्री-पुरूष भेद नसतो, हे बाळकडू मध्यमवर्गीय घरातील प्रेमाच्या चार भिंतीमध्ये मिळत गेलं. १२वी पर्यंतचं शिक्षण मी आई-वडिलांजवळ राहून पूर्ण केलं. पण त्यानंतर मी अभियांत्रिकीचा मार्ग निवडला. स्वत:च्या सर्वांगिण विकासाचा विचार करून मी पुण्याच्या वाटेने निघाले. शाळेत वक्तृत्व, निबंध किंवा खेळाची एखादी स्पर्धा यात कायम आघाडीवर असणारी मी पुण्यात आल्यावर थोडी बुजरी झाले. नवं वातावरण, नवी लोकं हे सगळं आपल्याला झेपेल का? या गोष्टीचं प्रचंड दडपण मनावर होतं. पण जसजसे दिवस पुढे सरकत गेले तशी माझी गाडी रूळावर येत गेली. मुळातच माझा स्वभाव बडबडा असल्यामुळे मित्र-मैत्रिणी तशा पटापट मिळाल्या. ज्या ग्रुप बरोबर मी कायम असायचे त्यांना कधी स्त्री-पुरूष भेदभाव रूचलाच नाही. त्यामुळे तू मुलगी आणि मी मुलगा म्हणून तू हे करू नकोस...किंवा तूझी पायरी एवढीच आहे. अशी वागणूक कधीच मिळाली नाही. प्रॅक्टीकल, लेक्चर्स, ट्रिप, परिक्षा सगळं आम्ही सोबत एन्जॉय करत होतो. कॉलेजची चार वर्ष या मस्तीत कधी मागे गेली कळलंच नाही. इंजिनिअरींगची फायनल परिक्षा दिली आणि प्रत्येकजण आपापल्या करिअरच्या वाटा शोधायला निघाला. नेमकं ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ असं म्हणतात ना तसंच काहीसं आमच्या बाबतीत झालं. काही लोकांना कॅम्पस मधून जॉब मिळाला. पण मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी अजूनही जॉबच्या शोधात होतो. विशेषत: मी मुलगी असल्याने मनावर प्रचंड ताण होता की, लवकर जॉब मिळाला नाही, तर घरचे माझं लग्न लवकर लावून देतील. कदाचित हे टेन्शन माझ्या पालकांना माझ्या चेह-यावर दिसलं असावं. आणि त्यांनी मला समजावून सांगितलं की, जोवर मला मनासारखा जॉब मिळत नाही, तोवर अशी कुठलिही जबरदस्ती ते माझ्यावर करणार नाहीत. नशीबाने मला काही महिन्यातच जॉब मिळाला.

आता घरात लग्नाचे वारे वहायला लागले होते. पण जसं करिअर निवडीची मुभा माझ्या पालकांनी मला दिली होती, तसंच स्वातंत्र्य माझ्या पसंतीचा मुलगा वर म्हणून निवडायचं मला होतं. अट फक्त इतकीच होती की, भले तो कुठल्याही जातीचा असो पण फक्त स्वत:च्या पायावर उभा आणि कुटूंबाची जबाबदारी घेणारा हवा. तसा मी त्यांचा जावई आधीच शोधून ठेवला होता. अगदी त्यांना हवा तसाच....Perfect....! आमच्या या नात्याची सुरवात मी कॉलेजमध्ये असतानाच सुरू झाली होती. त्याला निवडतांनाही माझ्यातली स्त्री जागरूक होती. मी निवडलेला मुलगा ‘स्त्री’ला स्त्री म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून बघणारा हवा होता. तो मला टिपिकल नवरा म्हणून नको होता. तर आयुष्याभरासाठीचा मित्र आणि एक जोडीदार म्हणून हवा होता. जो माझं मन जाणेल आणि देवकृपेने तो मला मिळाला. नऊ महिन्यांपूर्वीच गेल्या मे महिन्यात आम्ही लग्न बंधनात अडकलो. माझं माहेर नगर जिल्ह्यातलं पण सासर मात्र मराठवाड्यातलं हा फरक मला लग्नानंतर प्रकर्षाने जाणवलं. स्त्री वर्गाला मिळणारी वागणूक मराठवाड्यात पूर्णपणे वेगळी होती. इकडे मला करिअर आणि संसार दोन्हींचा समतोल साधून आयुष्य जगायला शिकवणारी माणसं होती. पण तिकडे मात्र तुम्ही करिअर करायचं पण संसार जास्त महत्वाचा अशी विचारसरणी असल्याचं जाणवलं. पण माझा नवरा मला पूर्णपणे ओळखणारा होता. संसार, नोकरी, पाहुणे हे सगळं करतांना माझी उडणारी भंबेरी त्याला दिसत होती आणि न बोलता त्याने सगळं समजूनही घेतलं. इतर कामात तो मला मदत करायला लागला. असा जोडीदार मिळणं हे माझं नशीबच म्हणायचं. आजही घरून स्वयंपाक करून ऑफिसमध्ये येऊन काम करणं. खरंतर खुप थकायला होतं. पण कुठल्याही पदावर काम करताना केवळ स्त्री आहे म्हणून दडपणाखाली न राहता काम करणं मला महत्त्वाचं वाटतं.

मी जेव्हा मुलांच्या बेधुंद, बेशिस्त वागण्याकडे बघते तेव्हा वाटतं, आपण मुलगी आहोत तेच चांगलं आहे. हे स्त्रीत्व अजून जगायला आवडेल.

खरंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन असा वेगळा साजरा करून आपल्याला खरंच काय मिळणार आहे. आपण स्त्रीयांनी स्वत:ला स्त्री म्हणून वेगळी वागणूक मिळावी यासाठी अट्टहास का करायचा? आपण तशाही आज पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय ना? मग हे वेगळे फार्स कशासाठी? तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगात वावरा तुम्ही खरंच त्या पात्रतेच्या असाल तर सारं जग तुमच्यापुढे नतमस्तक होईल...जसं आदिशक्ती पुढे होतं......

Kshitija Aware-Danve