Sign In New user? Start here.

मॄणाल कुलकर्णी

Mrunal Kulkarni interview

 

मॄणाल कुलकर्णी दिग्दर्शिकेच्या भूमिकेत.. -

मॄणाल कुलकर्णी
(अभिनेत्री)

मराठी हिंदी मालिका, चित्रपट अशा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अवंतिका म्हणून प्रसिद्ध असलेली प्रसिद्ध अभिनेत्री मॄणाल कुलकर्णी आपल्या सर्वांनाच परिचीत आहे. तिच्या अभिनयाविषयीही आपणा सर्वांना माहिती आहेच. मात्र आता मॄणाल कुलकर्णी यांना तुम्ही चित्रपट दिग्दर्शिकेच्या भूमिकेत पाहणार आहात. ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मॄणाल कुलकर्णी करणार आहेत. त्यांचा अभिनय ते दिग्दर्शिकेपर्यंतचा प्रवास.....याविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत....

* तुमच्या अभिनयाची सुरवात कशी आणि कधी झाली?

- दहावीनंतर भाषा आणि समाजशास्त्राची आवड लक्षात घेऊन आर्टसला मी प्रवेश घेतला. पुण्याच्या स.प.महाविद्यालयातील प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळे माझा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. फिरोदिया-पुरूषोत्तम अशा स्पर्धांमधून मॄणाल देव हे नाव पुढं येऊ लागलं होतं. त्यानंतर रॉय किणीकर यांच्या कवितांवर ‘उत्तररात्र’ हा कार्यक्रमही मी केलेत. यातूनच ‘स्वामी’मधील रमासाठी मला विचारण्यात आलं. कुतूहल आणि नवीन माध्यमात काही तरी वेगळं करायला मिळण्याची इच्छा म्हणून गजानन जहागिरदार यांना मी होकार कळवला आणि ख-या अर्थानं अभिनेत्री म्हणून माझ्या प्रवासाला सुरवात झाली.

* अभनय करता करता दिग्दर्शनही करावं असं का वाटलं?

- गेली २० वर्ष अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर आता काहीतरी नवीन करून बघावं असं वाट्लं, म्हणून चित्रपट दिग्दर्शन करण्याचं मी ठरवलं. पण नवीन काही करावं म्हणून attempt होत नसतो. ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम’ या चित्रपटाचा विषय खुप दिवसांपासून माझ्या मनामध्ये होता. दिग्दर्शन करायचं ठरवलं तर आधी हा विचार केला की, या विषयावर आपल्याला काय वाटतं, ही कथा लिहिली पाहिजे. मी कथा लिहिली सर्वांना ऎकवली आणि ती सर्वांना आवडली सुद्धा...हिंदीतील ‘भूलभूलैय्या’, ‘माला माल विकली’ हे चित्रपट लिहिलेल्या मनीषा कोरडे हिलाही कथा ऎकवली. मुळातच तिला असलेल्या अनुभवामुळे तीने माझ्या चित्रपटासाठी उत्तम पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. हे करत असतांना माझा आत्मविश्वास खुपच वाढला. आपल्याला जे म्हणायचे आहे ते आपण प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवत आहोत. आजपर्यंत चित्रपट माध्यम एका अभिनेत्रीकडे मनोरंजनाच्या अंगानी पाहत होत. त्याहून पुढचं पाऊल उचलावं म्हणून मी दिग्दर्शनाचा विचार केला.

* तूम्ही पहिल्यांदाच दिग्दर्शन करत असलेल्या चित्रपटाविषयी सांगा.

- सद्या लग्न संस्थेमध्ये जे बदल होत आहेत त्याबद्दल आपण काही केले पाहिजे, असं मनात होतं. या विचारातून ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम’ या कथेचा जन्म झाला. चार-पाच पिढ्यांचे याविषयीचे मतं कसे बदलत आहे. यातून पुढे लग्न संस्थेचं काय होणार आहे. स्त्री आणि लग्नाचा संबंध यावरचा हा चित्रपट आहे. यात सचीन खेडेकर, पल्लवी जोशी, सुनील बर्वे, विक्रम गोखले, सुहास जोशी आणि मी स्वत: अभिनय करत आहे. या महिन्यात या चित्रपटाचं शूटींग सुरू होणार असून मे महिन्यापर्यंत शूटींग पूर्ण होईल. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक वेगळा विषय दिग्गज कलाकारांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

* एवढ्या बिझी शेड्युलमधून काम आणि घर सांभाळनं कसरतीचं काम आहे. हे सर्व कसं जमतं?

- लग्नानंतर ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांची सून म्हणून मी त्यांच्या घरात गेले. व्यवसायाने वकील असलेल्या रूचिर कुलकर्णी यांच्याशी प्रेमविवाह केला. माझे पती रूचिर हे जरी वकील असले तरी सोबतच उत्तम रसिक, जाणकार, वाचक, समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक आहेत. लग्नानंतर मुलगा ‘विराजस’ याच्या जन्माने मला एक वेगळीच ऒळख मिळाली. आई होण्याचा अनुभव जगताना अभिनयाला काही काळासाठी विराम दिला. त्यानंतर रूचिर यांच्या मार्गदर्शनाने परत अभिनयाला सुरवात केली. एकत्र कुटूंब मला फार आवडतं. एकत्र कुटूंब टिकवण्याची जबाबदारी सर्वांवर असते, तरच संबंध चांगले राहतात. माझ्याकडे समजून घेणारं वातावरण आहे म्हणून मी हा व्यवसाय करू शकले. मी मुंबईत तर माझं कुटुंब पुण्यात आहे. सासू, सासरे, दीर, जाऊ, पुतण्या, पुतणी आणि विराजस हे पुण्यात असले तरी मनानं आम्ही खुप जवळ आहोत. विराजस आता अकरावीत शिकतो आहे. त्याच्या लहानपणी मी इतकी व्यस्त नव्हते. पण नंतर वाढत्या व्यापामुळे त्याच्यापासून दूर राहावं लागायचं. सुरवातील खुप अस्वस्थ वाटायचं पण त्यानं कधीही तक्रार केली नाही. त्याच्या आणि घरच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच आज मी ह्या क्षेत्रात काम करू शकते आहे.

* २१ व्या शतकातील स्त्रीबद्दल तूमचं काय मत आहे?

- खरंत २१ व्या शतकातील स्त्री ही खुप लकी आहे, भाग्यवान आहे असं मला वाटतं. याचं कारण, प्रत्येक घरातून त्या त्या मुलीला शिक्षणासाठी मोठा पाठींबा मिळतो आहे. ती स्वत:च्या पायावर उभी रहावी यासाठी तिला प्रोत्साहन मिळत आहे. आजच्या स्त्रीला तिचं आवडतं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. आज असं एकही क्षेत्र उरलेलं नाहीये की, ज्यात स्त्रीचा सहभाग नाही. गृह-उद्योगापासून ते विमान चालवण्यापर्यंतचं काम महिला करीत आहेत. हे चित्र खुप आशादायी आहे. पुढच्या दहा-पंधरा वर्षात हे चित्र आणखी बदलेलं दिसेल. याची मला खात्री आहे.

अमित इंगोले