Sign In New user? Start here.

रोहिणी हट्टंगडी

Rohini Hatangadi interview

 

आजची पिढी कमिटमेन्टला घाबरते... -

रोहिणी हट्टंगडी
(अभिनेत्री)

रोहिणी हट्टंगडी मराठी-हिंदी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून आपणा सर्वांना परिचीत आहे. आईची भूमिका असो, पत्नीची भूमिका असो की, मग सासूची भूमिका असो त्यांनी त्यांच्या प्रत्येक पात्रात जीव ओतून काम केलं आहे. आजही त्यांनी साकारलेली ‘अग्निपथ’ या हिंदी सिनेमातील आई डोळ्यांसमोर येते. तसेच ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील आशातला देशमुख ही भूमिका सुद्धा विसरता येणार नाही. अनेक गाजलेल्या नाटकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. महिला दिनानिमित्त त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न....

* तुमची या क्षेत्रातील कारकिर्द कशी सुरू झाली?

- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर फ्रेडी लॉरेन्स गार्सिया यांच्या स्पॅनिश नाटकावर आधारित ‘चांगुणा’ हे मराठी नाटक महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेत खुप गाजलं. या नाटकासाठी मला ‘सर्वोत्कॄष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार’ मिळाला. आणि अशा प्रकारे माझा चित्रपटाच्या विश्वातील प्रवास सुरु झाला.

* महिलांना चित्रपटात काम करण्याचं आज जेवढं स्वातंत्र्य आहे, तेवढं तुमच्या सुरवातीच्या काळात होतं का?

- माझ्या पिढीला हा त्रास झाला नाही, पण माझ्या आधीच्या पिढीला हा त्रास मोठया प्रमाणात झाला. जसे की, दुर्गा खोटे यांना त्यांच्या काळात हा त्रास होत असे. सन १९७० च्या काळात मी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये शिकत होते. तिथून परत येऊन मी थिएटर ला सुरुवात केली. हा एक मात्र आठवतं की, मी जेव्हा शाळेत होते तेव्हा स्पर्धांमध्ये आणि इतर ठिकाणीही काम करायचे. तेव्हा मुलींची चणचण मात्र भासायची. या क्षेत्रात काम करायला मुली मिळायच्या नाहीत. ललीत कला मडंळाच्या विविध उपक्रमामध्ये मी काम करायचे. पण अगदीच बंधनं आहेत असं नव्हतं, ‘काय....? मुलगी नाटकात काम करते...?’ असं होत नव्हतं. मात्र त्यांना काम करायचे असल्यास फक्त फॅक्टरीच्या आत काम करण्याची मुभा असायची, असा ही थोडासा प्रॉब्लम होतं असे. पण मी जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या या कलेला जपण्याचा प्रयत्न मी केला, तेव्हा मला घरातुन एकाच अटीवर मुभा मिळायची की, अभ्यासात कुठेही कमी न पडता तुझी कला जोपासायची, असे मत माझ्या आई-वडीलाचे होते. मात्र लग्नानंतर आधी घरातलं बघा आणि मग बाहेरचं काम करा. असं स्वरुप अजुनही आहे.

* अभिनय क्षेत्रात येतांना काही अडचणी आल्यात का? कोणत्या आणि कशा सोडवल्या?

- खरंतर मला अडचणी नाही आल्यात. पण मला घरातून फार चांगले प्रोत्साहन मिळाले. माझे वडील(अनंत ओक) नाटकात काम करत असल्यामुळे मला फारसा त्रास नाही झाला. ते फार अ‍ॅक्टीव्ह होते. माझ्या आईला तशी हौस होतीच. मी नाटकांमध्ये काम करायचे याचा सर्वात जास्त आनंद माझ्या घरातील लोकांना होता. माझं त्याबाबत फार कौतुकही व्हायचं. त्यामुळे मला घरातून प्रोत्साहन डेफिनेटली मिळालं. विरोध झाला नाही. फक्त एक टांगती तलवार असायची की, मी कुठेही नापास झाले किंवा नंबर खाली गेला, तर धमकी देऊन ठेवली होती की, सर्व बंद करणार... मी नाटकांसोबतच स्पोर्टस पण खेळायचे. त्यानंतर मग मी दिल्लीला नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये शिकायला गेले. शिवाय तिथे माझे नातेवाईक ही नव्ह्ते. त्यामुळे थोडी काळजी असायची, पण कुठेही त्यांनी मला बंधनात ठेवलं नाही. माझा सर्वात मोठा छंद म्हणजे अभिनय करणे, त्याला त्यांनी सकारात्मक मार्गदर्शन दिले. अभिनया व्यतिरीक्त माझा छंद म्हणजे विविध प्रकारचे पदार्थ बनवणे. सोबतच माझा वाचनाचा छंदही मी जोपासते.

* २१ व्या शतकातील स्त्रीबद्द्ल तुमचं काय मत आहे?

- आपण स्त्री स्वातंत्र्याची सकंल्पना लक्षात घेता, स्त्री निश्चितच स्वतंत्र झाली आहे. पण अगदी स्वतंत्र म्हणतो तेव्हा आपण फक्त शहरी वातावरणच लक्षात घेतो. फक्त शहरी स्त्री बाबतच आपण असं म्हणतो, ग्रामीण भाग आपण लक्षात घेत नाही. एकंदरीत आपण देश घडवण्याचा विचार करतो तेव्हा सर्वात जास्त मह्त्वाच असं की, ग्रामीण भागातील स्वातंत्र्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचंआहे. शहरामध्ये तर हे झालं आहे. पण जी डिपेन्डन्सी अशी होती, की एक तर कुटुंब म्हणून होती. दुसरी पैशाची डिपेन्डन्सी होती. आता पैशाची डिपेन्डन्सी कमी होतं असल्यामुळे थोडेसे बिनधास्तपणे निर्णय घेतले जातात. तिथे थोडीशी काळजी अशी वाटते की, त्यामुळे नात्यातील कमिट्मेन्ट जी आहे ती कमी होत आहे. आत्ता ही परीस्थीती आहे. पुर्वी अ‍ॅड्जस्टमेंट करुन घेण्याकडे जो कल होता. तो आता राहीला नाही. लग्नाचं वय वाढल्यामुळे कुठेतरी निर्णय घेण्याची समज वाढत जाते. आजची पिढी कमिटमेन्टला घाबरते. आजच्या पिढीच्या अपेक्षा कुठे तरी वाढत आहेत.असे मला वाटते.

* मराठी चित्रपटांपाठोपाठ तुम्ही काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांतही काम केलं आहे?त्याचा अनुभव कसा होता?काय वेगळेपण जाणवलं त्यात?

- सन १९८२ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी लॉर्ड रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी ‘गांधी’ या चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी माझी निवड केली. चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे फिल्ममेकिंग. भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर इंग्रजी चित्रपट असल्याने संवादफेक करण्याचे रितसर प्रशिक्षण घ्यावे लागले. त्यानंतर निवडचाचणी घेतली. त्यात सर्वोत्कॄष्ट म्हणून माझी निवड झाली. व्यक्तिरेखा कोणतीही असो, माध्यम कोणतेही असो ती व्यक्तिरेखा आपण १०० टक्के चांगली साकारण्यासाठी काय करायचे याचे ज्ञान एनएसडीमध्ये असतानाच शिकले होते. त्याप्रमाणे कस्तुरबा गांधी ही व्यक्तिरेखा साकारली आणि त्या वर्षी बाफ्टा पुरस्कारही आपल्याला मिळाला. त्यावेळी प्रत्येक क्षणी असं वाटायचं की,नियम आणि सुविधा त्यांच्याकडे जास्त होती. ते आपण जाणून घेणं फार गरजेचं होतं असं मला त्यावेळेस वाटायचं. पण आत्ता त्या सुविधाही आपल्याकडे वाढल्या आहेत. आता ग्राफ पण लोकं चांगला करताहेत. त्यामुळे आपण ही तितकेच स्पर्धात्मक आहोत.पण फक्त इतकच होतंय की, कमर्शीयल मध्ये एकाने काहीतरी केलं तर तसच सगळे करायला सुरुवात करतात. ही वृत्ती कमी होणं गरजेची आहे. नवीन काही तरी सुचने व त्यावर काम करणे गरजेचे आहे.

* सद्या मराठी अभिनेत्रींना चांगले दिवस आलेत असं तुम्हाला वाटतं का?

- मराठी चित्रपटानांच एकंदरीत चांगले दिवस आले आहेत. कारण ज्याप्रमाणे मागील ३-४ वर्षात चित्रपट निर्माण झाले आहेत.अगदी ‘श्वास’ पासुन सुरुवात केली. म्हणजे ‘चौकत राजा’, कळत नकळत’ ते आत्ताचे ‘देऊळ’, ‘ता-यांचे बेट’ आहेत. अशा विविध थिम चे चित्रपट आत्ता तयार होत आहे. खुपच चांगली ट्रिटमेन्ट एक सिनेमा म्हणून मिळत आहे. मला असं वाटतं की आत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मराठी सिनेमा आपली छाप पाडण्यात यशस्वी होत आहेत.

* नाटक, मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांमध्ये तुम्ही भरभरुन काम केलं आहे? याबद्द्ल तुमचे अनुभव?

- ई-टीव्ही मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील आशालता देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतानाचा अनुभव स्मरणात राहील असा आहे. यापूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या ‘खानदान’ या हिंदी मालिकेत गिरीश कर्नाड यांच्या पत्नीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली.प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या ‘पडघवली’ या कादंबरीवर आधारित ‘कुछ खोया, कुछ पाया’ या डॉ. सतीश राजमाचीकर यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या मालिकेत अभिनय करण्याचा अनुभवही खूप काही देऊन गेला. हिंदी मालिकांमध्ये रवी राय यांच्या ‘इम्तिहान’, ‘थोडा है थोडे की जरूरत है’ आणि ‘टीचर’ या मालिकांमधील अनुभवही आपल्या अभिनय कारकीर्दीत लक्षात राहणारा असाच आहे. विविध व्यक्तिरेखा अभिनयातील करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यात साकारायला मिळाल्या. त्या भूमिका साकारताना आपण स्वत:ही समृद्ध होत जातो. त्यामुळे त्या व्यक्तिरेखा कळत-नकळत बरंच काही आपल्याला देऊन जातात.

* या क्षेत्रात नव्याने काम करणा-या तरुण मुलींना तुम्ही काय सागुं इच्छिता?

- फक्त महिलां नाच सागांयचं असेल तर keep your dignity and do it what ever you want , keep your priority is right.

* महिला दिनानिमित्त आजच्या महिलांना काय संदेश द्याल.?

- मला सगळ्याना असं सागावं असं वाटतं की, महिलांनी आपली ओळख कुठेही लुझ होऊ देऊ नये आणि महिला जे अन्याय सहन करतात ते हाताबाहेर सहन करु नये.असं माझं स्वत:चं मत आहे. कोणताही निर्णय देताना दहा वेळेला विचार करा आणि मग निर्णय द्या.

स्नेहा मुथा