Sign In New user? Start here.

स्नेहा मुथा

 
आवाजातील मिरॅकल -

स्नेहा मुथा
कन्टेंट रायटर
झगमग डॉट नेट

आज महिला विविध व्यवसायिक क्षेत्रात काम करताना दिसतात. मी देखिल अशाच उत्साहाने जनसंवाद व वॄत्तपत्र विद्या विभागात प्रवेश घेतला आणि तो महाराष्ट्रातून नव्याने सुरु झालेला पदवी कोर्स होता. माध्यमात काम करणं म्हणजे रिपोर्टर प्रमाणे बातम्या देणं एवढीच गोष्ट आमच्या मनात उत्सुकता वाढवत होती. मात्र जेव्हा आम्ही प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात केली तेव्हा कळालं की, माध्यम क्षेत्र हे किती अफाट आहे. मग विचार केला की, नेमका कोणता विषय निवडायचा. उदा.सांगायचे झाले की, जाहिराती, श्राव्य माध्यम, दॄक श्राव्य माध्यम, मुद्रीत माध्यम की वेब पत्रकारीता अशा विविध माध्यमातून आपल्या करीअरसाठी एक क्षेत्र निवडणे व त्यात चालू घडामोडीचे परीपुर्ण ज्ञान ठेवणे महत्वाचं असतं. त्यातल्या त्यात एक पत्रकार म्हणून घटनास्थळी जाणे आणि तिथे कोणी विचारले असता मी एका अमुक वर्तमानपत्राची वार्ताहर आहे, असे सांगितल्यावर लोक एका वेगळ्याच दृष्टीकोनातुन आमच्याकडे पाहतात आणि मनातल्या मनात विचार करत असतील की, या क्षेत्रात पण महिला एवढया धाडसाने काम करतात...! मग प्रामाणिकपणे घटीत परीस्थीतीची चर्चा करतं.

मी माझे पदवीचे शिक्षण पुर्ण करता करता आवाजाच्या दुनीयेकडे वळाले. बघता बघता माझ्या प्रयत्नाला यश आलं आणि मी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रात हंगामी वार्ताहर म्हणून रुजु झाले. मी माझ्या आयुष्यात सर्वात पहिलं रीपोर्टींग केलं, ते पोलीस क्रीडा स्पर्धांचे. सलग तीन दिवस मी एका टीम बरोबर प्रशिक्षण घेता घेता या आवाजाच्या दुनीयेतील विविध संभाषणातील शब्दांबरोबर खेळत होते. आकाशवाणीतील टॉक स्टुडीओत आणि मी स्वत: स्वत:शी बोलत होते. स्पिकरमधून येणारा माझाच आवाज मी ऎकत वेडी होत असे. टेबल वरची पानं पलटत होती आणि मी क्रीडा स्पर्धेचा आढावा देण्यात मग्न होऊन गेले होते. त्या दिवशी मी अनुभवलं ते माझ्या स्वत:च्याच आवाजाचं सौंदर्य. असे वाटु लागले होते की, मी निवडलेलं क्षेत्र खरंच योग्य आहे. अशा रीतीने मी माझ्या पदवीत्तर शिक्षणासाठी पुढे सरकले. विकसित तंत्रज्ञानाच्या अभ्यासाकरीता मी पदवीत्तर शिक्षणासाठी पुण्यातील ‘मराठवाडा मित्र मंडळ’ या महाविद्यालयात प्रवेश घेतला. मी सांस्कॄतीक कला गुणांनी संपुर्ण पुणे शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. रोज माध्यम क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींना ऎकत होते. हे करता करता मी पुणे आकाशवाणी केंद्रात हंगामी वार्ताहर म्हणून रुजु झाले आणि ते देखिल सांस्कृतिक बीटवर...! ह्याचा मला फार आनंद आहे. त्यानंतर आज मी तारे - तारकांच्या लखलखत्या दुनियेतील विविध घडामोडींना संपादीत करते. त्यांच्या आवाजातील लकबींना कैद करण्याचे काम मनोरंजन क्षेत्रातील झगमग डॉट नेट ह्या वेबसाईटवर करत आहे. अनेक वर्षानंतर महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या आयुष्याकडे मागे वळून बघताना आयुष्याने दिलेल्या संधींविषयी मी अतिशय कृतज्ञ आणि समाधानी आहे. या सगळ्या वर्षांत माझ्या जीवनाच्या प्रवासात किती तरी माणसं आली आणि त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरुपात वेळोवेळी मार्गदर्शन केले मी त्यांची ऋणी आहे.

खरंतर एक व्यक्ती म्हणून मी या संस्थेचा एक छोटासा भाग आहे. आपल्या विषयाचं ज्ञान मिळवण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व म्हणून आपण विकसित होण्यासाठी संस्थेचा मोठा हातभार असतो. एकमेकांच्या सहकार्यानं पुढे जाणं, आपलं व्यक्तिगत आयुष्यही समाधानानं घालवणं हेच माझ्या मते आपलं ध्येय असायला हवे.

हे जग पुरुषांचं आहे की महिलांचं, यावर भांडत बसणं योग्य नाही. पण आता परिस्थिती बदलली आहे. स्त्रिया आता घराबाहेर पडून फक्त नोकरी करत नाहीत... त्या 'करिअर' करायला लागल्या आहेत. त्याचबरोबर घरच्या सगळ्या जबाबदाऱ्याही त्यांनी उत्तमपणे पार पाडायला हव्यात, ही अपेक्षा आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, एक व्यक्ती म्हणून पुरुष आणि स्त्रियांकडून करिअरच्या सारख्याच मागण्या दिसून येतात.

प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने करिअरचा विचार केलाचं पाहिजे, आपल्या सुप्त गुणांना लक्षात घेऊन स्वतंत्रपणे आपल्या करीअरच्या दिशा ठरवणं . त्यानेच विचाराची प्रगल्भता दिसुन येईल.

जागतीक महिलादिनाच्या शुभेच्छा.

स्नेहा मुथा