Sign In New user? Start here.

सोनाली जोशी

 
ताजा हो ले....! -

सोनाली जोशी
सॉफ्टवेअर टेस्टर
सातेरी सॉफ्टवेअर प्रा.लि.

काही दिवसांपूर्वीचा प्रसंग...! संध्याकाळची वेळ. जेवण आटोपून आम्ही सगळे मोठे टिव्ही प्रोग्राम बघत बसलो होतो. तेव्हा टिव्हीवरची एक जाहिरात मला मनापासून भावली. जाहिरात होती एका चहाच्या ब्रॅन्डची. आई आणि मुलीतला संवाद! लेक म्हणते, "आई मी मोठेपणी कॅप्ट्न होणार". मग मुलगी आईला म्हणते, "पण तू आता हे काय कारते आहेस"? मग आई सांगते की, मी मोठेपणी लेखिका हॊणार. हे मी माझ्या आईला म्हणजेच तुझ्या आजीला लहान असतांना सांगितले होते. म्हणून आता मी स्टोरी लिहिते आहे.

आणि विचारांची वेगळीच मालिका डोळ्यांसमोर तरळली. असं वाटलं कदाचित २१ व्या शतकात लग्नानंतर पुन्हा करिअरचा जम बसवणा-या आजच्या मुलीची ही २ मिनिटांची चालती बोलती कहाणी आणि त्यातलीच एक माझी ही छोटीशी गोष्ट..!

बीएस्सी आणि एमसीएम केल्यावर नोकरीत बसलेला जम आणि त्यानंतर मिळालेली सुयोग्य साथीदाराची सुरेल साथ यथावश्यक चिमण्या पावलांनी आणि बोबड्या बोलांच्या आगमनाने बहरलेला आसमंत आणि त्या आसमंताची गोडी कळल्यावर स्वत:ची ओळख विसरून सहज आईत रूपांतरीत झालेली मी...त्या चिमण्यांच्या वाढण्यातला आनंद कुठल्याही पॅकेजमध्ये न मावेल असाच होता. मग कालांतराने लक्षात आलं की, अरे आता चिमण्याही आपलं आरशातलं प्रतिबिंब पाहून स्वत:ची ओळख शोधू पाहताहेत आणि आपण मात्र ती कधीच मागे सोडून पुढे आलो. मग मात्र मला पुन्हा एकदा घरट्या पलिकडचं क्षितिज पुकारू लागलं आणि मी आज तब्बल सहा वर्षांनंतर बाहेरच्या जगात नवा जम बसवू पाहत आहे. आव्हाने खुप मोठी आहेत, पण सर्व भूमिका चोख बजावणा-या आईचे, लग्नानंतर सासूबाईंचे भक्कम संस्कार आणि स्वानुभवाची शिदोरी पुढे नेणा-या आईच्या खांद्यातल्या बाळाची प्रचिती हा खरंच ‘ताजा हो ले’ चाच अनुभव आहे, असे म्हणावे लागेल.

लग्नापूर्वीचे करिअरचे दिवस, आई-वडीलांनी मनावर दगड ठेवून केलेली नोकरी, सांभाळलेली करिअर्स, त्यामुळे सुयोग्य मार्गाला लागलेले आम्ही ही एक प्रकारची संस्कार शिदोरी आम्हाला माझ्या लेकींना द्यायची आहे. कारण पिढ्यांपिढ्या आरशात आईच्या रूपाचं अनुकरण करणा-या पिढ्यांपैकी माझी आई, मी आणि माझ्या लेकी ह्या तीन पिढ्यांचा समावेश आहे.

त्यामुळे माझी पावले अजूनच दमदार पुढे पडतील आणि आयुष्याच्या नव्या वळणावर मला भेटलेली मी नक्कीच मुलीं पुढचाही आदर्श होईन असं मला नक्कीच वाटतं.

सोनाली जोशी